विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करा, असं म्हणत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला

विरोधक हे धारातीर्थी पडले आहेत, त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितलेल्या सप्तसुत्रानुसार पक्षाचे काम पुढे न्या आणि परिवर्तन घडवा, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी कार्यकर्त्यांना दिला.

  पुणे : विरोधक हे धारातीर्थी पडले आहेत, त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितलेल्या सप्तसुत्रानुसार पक्षाचे काम पुढे न्या आणि परिवर्तन घडवा, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी कार्यकर्त्यांना दिला.

  नड्डा यांनी काॅंग्रेस आणि भाजपने केलेल्या विकासकामांची तुलना करीत काॅंग्रेसवर टीका केली. पक्षाच्या चार पिढ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर आपला पक्ष येथे पाेहाेचला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वामुळे भारताची एक वेगळी ओळख जगात निर्माण झाली आहे. काेराेनामुळे निर्माण झालेल्या जागतिक मंदीतही भारताने जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून ओळख निर्माण केली. विकसनशील देशांची तुलना करता आपल्या देशाचा आर्थिक विकासाचा दर हा चांगला आहे. रेल्वे, विमान, रस्ते बांधणीमध्ये हजारो कोटींची कामे झाली आहेत.

  लाखाेंना राेजगार मिळाले, माेबाईल निर्मिती आता आपल्याच देशात केली जात आहे. हा सर्व विकास पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. लाेकांना आपल्याकडून माेठ्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी चिंतन केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सांगितलेली सेवाभाव, संघटन, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मक विचार, संवाद या सप्तसुत्रीचा वापर केला पाहीजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  राज्य सरकारचे २२५ प्रकल्प

  राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करीत आहे. राज्य सरकारने २२५ प्रकल्प केले आहेत. एकट्या मुंबई मध्ये ३८ हजार कोटींची कामे मंजूर केली असून सुरू देखील झाली आहेत. गाव, गरीब, युवा, महिलां, दलित वर्गांसाठी मोठी कामे केली आहेत, असेही नड्डा म्हणाले.

  पक्षाच्या वाटचालीत व्यक्तीगत याेगदान मिळायला हवे. आपल्याला दुसऱ्याच्या कमजाेरीमुळे मिळालेला विजय नकाेय तर आपल्याला आपल्या ताकदीवर मिळालेला विजय हवा आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने पुढील काळात नवीन दहा कार्यकर्ते जाेडले पाहीजे.

  -जे. पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष