श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

श्रीगोंदा तालुक्यात विविध भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे आता तालुक्यातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.

  श्रीगोंदा : गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवणूक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानचं मिळाले आहे. तालुक्यात विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता तालुक्यातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.

  बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणून पाणठेला, चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात दारूविक्री, सट्टा पट्टी, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे.

  तरूणांनी सट्टा पट्टीला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे. घरून पाहिजे तेवढा पॉकेटमनी मिळू शकत नाही, घरून मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये तरूणांच्या गरजा भागू शकत नाहीत़, यावर तरुणांनी उपाय शोधला असून, सट्टा पट्टीवर पैसा लावून जादा पैसा कमावण्यात तरूण लागले आहेत. सट्टा पट्टीवर तरूणांना सव्वा रूपयात शंभर रूपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडले जात आहे. तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारीकडेही वळत आहेत.

  या सट्टा पट्टीच्या नादी लागूण कित्येक तरुण दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात. शहरात कित्येक सट्टा पट्टी दलालांनी पट्टी घेण्याचे कार्यालय लावलेले आहे. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत. तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे असते. बेलवंडी पोलिस स्टेशन या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खुलेआम अवैध धंदे सुरू आहे. देशी दारू, विदेशी दारू, गुटखा,विक्री राजरोसपणे सुरू आहे. मात्र असे असतानाही पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

  मासिक टार्गेटमध्ये चेल्याचपाट्यावर कारवाई

  अवैध धंद्याबाबतची कल्पना पोलिस प्रशासनाला आहे. असे असताना अवैध धंद्यावर ‘मासिक टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी धाड टाकण्यात येते. या धाडीत पैसा, ‘चेल्याचपाट्या’ ला ताब्यात घेवून पोलीस कारवाईचा आव आणतात. त्यातून सर्व‘आलबेल’ असल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात मात्र, पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी संबंध हे त्यांना धंदा सुरू ठेवू देण्यासाठीच असल्याचे तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र बोलले जात आहे.

  बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर दिड महिन्यानंतर नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे धंद्यांवाल्यांच्या मुसक्या आवळणार का? याकडे परिसरातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अवैध धंद्यांवर काय कार्यवाही करणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.