झेडपी शाळेतील शिक्षकाची नियमबाह्य बदली ; बारा शिक्षक संघटनांनी पुकारला एल्गार

ग्लोबल टीचर रणजीत डिसले गुरुजी यांच्या राजीनामा नाट्यावरून तापलेले वातावरण शांत होते न तोच करमाळा तालुक्यातील कावळवाडी एका शिक्षकाच्या नियमबाह्य बदलीवरून बारा शिक्षक संघटनांनी प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

    सोलापूर : ग्लोबल टीचर रणजीत डिसले गुरुजी यांच्या राजीनामा नाट्यावरून तापलेले वातावरण शांत होते न तोच करमाळा तालुक्यातील कावळवाडी एका शिक्षकाच्या नियमबाह्य बदलीवरून बारा शिक्षक संघटनांनी प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

    कावळवाडी झेडपी शाळेतील सर्वांत सेवाकनिष्ठ शिक्षक चंद्रहास शिंदे यांची प्रशासनाने नियमबाह्य केलेली बदली रद्द करण्याची मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय गुरुसेवा परिवारातर्फे तब्बल १२ शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी उप मुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना लेखी निवेदन दिले आहे. कावळवाडी शाळेत उपशिक्षकांची मंजूर पदे दोन असून कार्यरत उपशिक्षक ३ आहेत. पैकी १ उपशिक्षक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर येथे २०१८ पासून विषय सहाय्यक पदी शिक्षण आयुक्त यांच्या आदेशानुसार प्रतिनियुक्तीने कार्यरत आहे. सद्यस्थितीत कावळवाडी येथे एकूण ४८ विद्यार्थी शिक्षण घेत असून २ शिक्षक तेथे अध्यापनाचे काम करत होते. परंतु सर्वांत सेवाकनिष्ठ असलेल्या शिंदे यांची नियमबाह्य बदली करण्यात आली आहे. आता कावळवाडी शाळेत ४८ विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत आहे.मंजूर पदे २ व कार्यरत पदे ३ यांचा विचार करता अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सेवाज्येष्ठतेने व्हायला हवे होते. परंतु हा नियम डावलून चक्क कावळवाडी शाळेतील सर्वांत सेवाकनिष्ठ शिक्षक शिंदे यांची जिल्हा परिषदेने बदली केल्याने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या नियमबाह्य बदलीबाबत शिक्षकांत वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

    याच अनुषंगाने जिल्ह्यातील १२ शिक्षक संघटना मिळून स्थापन झालेल्या सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय गुरुसेवा परिवाराच्यावतीने सर्व जिल्हा अध्यक्षांच्या स्वाक्षरीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निवेदन देऊन शिंदे यांची नियमबाह्य बदली रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर शिवानंद भरले,म.ज.मोरे,राजकुमार राऊत,मसूद सिद्दीकी,हरिश कडू,विजय लोंढे,राम बिराजदार,नवनाथ धांडोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिक्षकांना दशसूत्रीच्या नियमाचे पालन करण्यास सांगणारे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे या प्रकरणी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.