मी फक्त दाेन ते तीन दिवस विरोधी पक्षात; रावसाहेब दानवेंनी राज्यात सत्ता स्थापनेचे दिले संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान अशातचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठ विधान केलं आहे.

  जालना : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सध्या महारष्ट्राचं अख्ख राजकारण हादरलंय. मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निधून गेल्याने शिवसेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान अशातचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठ विधान केलं आहे.

  जालना जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका आता राज्य सरकारचे थोडेच दिवस उरले असून मी फक्त दाेन ते तीन दिवस विरोधी पक्षात आहे अशी टिप्पणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आराेग्य मंत्री राजेश टोपे यांना उद्देशून त्यांच्या समोरच केली. दरम्यान अजून संधी हवी असेल तर विचार करता येईल, असे म्हणत दानवे यांनी भविष्यात राज्यात सत्ता स्थापनेचे संकेत दिले.

  जालन्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाचे भूमिपूजन आज (रविवार) केंद्रीय मंत्री दानवे आणि आराेग्य मंत्री टोपे यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी आयाेजिलेल्या कार्यक्रमात दानवे बोलत होते.

  दानवे नेमकं काय म्हणाले?

  जालना जिल्ह्यातील प्रत्येक खात्यांवर आपले लक्ष हवे. जिल्हाधिकारी कार्यालय असाे, कृषी कार्यालय असाे अथवा अन्य काेणतेही आपण (दाेघे) जबाबदारीने त्यावर लक्ष ठेवून त्यांचा कारभार जिल्ह्याच्या विकासासाठी हाेत आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. तुम्ही राज्यात मंत्री आहात. मी केंद्रात आहे. दाेघे मिळून जिल्ह्याचा विकास साधू असेही दानवेंनी नमूद केले. तसेचं 14 वर्षात तुम्ही जे काही केेले आणि जे करण्याचे राहिले आहे. ते करुन घ्या. मी दाेन ते दिवसच विराेधी पक्षात आहे. त्यानंतर तुम्ही देखील विचार करु शकता असा टाेलाही दानवेंनी टाेपेंना सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामाेडींवर मारला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता दानवे यांनी फेटाळून लावली. तसेच शिंदे गटाशी युती करायची की नाही याबाबत भाजपचे राज्यातील नेते निर्णय घेतील असंही दानवे यांनी म्हटलं आहे.

  देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची गुजरातमध्ये कोणतीही भेट झाली नाही असंही दानवे यांनी नमूद केले. ते म्हणाले आमच्या पक्षाच्या बैठका जरी सुरू असल्या तरी राज्यातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. राष्ट्रवादी कायदेशीर लढाई त्यांच्या पद्धतीने लढणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे असंही दानवे यांनी स्पष्ट केले.

  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची देवेंद्र फडणवीस यांनी परवा रात्री सुरत मध्ये भेट घेतली अशी चर्चा आहे. त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे गट व भाजप परत सत्तेवर येते काय असे सगळ्यांना वाटत आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मला तुमच्याकडून कळत आहे. मी प्रवासात व्यस्त आहे. देवेंद्रजींचा स्पीड आहे. ते जेव्हा अपॅाईंटमेंट मिळेल. तेव्हा भेटी घेतात. असे पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.