कृष्णा कालव्यात तात्काळ पाणी सोडा, अन्यथा…; पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा

कृष्णा कालव्यातून मधून पाणी सोडण्यात दिरंगाई होत असल्याने पाण्याविना पिके वाळून चालली आहेत. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी पलूस तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

    पलूस : कृष्णा कालव्यातून पाणी सोडण्यात दिरंगाई होत असल्याने पाण्याविना पिके वाळून चालली आहेत. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी पलूस तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. कृष्णा कालव्यात तत्काळ पाणी सोडा, अन्यथा तीव्र आंदोलनांचा इशारा पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

    या मागणीचे निवेदन तहसीलदार दीप्ती रिटे, पाटबंधारे विभाग किर्लोस्करवाडी, पलूस पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक प्रविण साळुंखे यांना देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विशाल दळवी, मारूती चव्हाण, गणपतराव पुदाले, गणपतराव सावंत, मानसिंग इनामदार, सुधीर पाटील, रोहित दळवी, पोपट माळी, रोहित मोरे, सागर मोरे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पलूस तालुक्यातील वसगडे बंधारे पर्यंत कृष्णा कालवा हा छोटी कृष्णा नदी म्हणून ओळखला जातो. या कालव्यावर शेती मधील उस, द्राक्षबाग अन्य पिके या रब्बी हंगाम खरीप आणि या तिन्ही ऋतुमध्ये कृष्णा कालव्यावर सर्व पिके अवलंबून आहेत. परंतु पाऊस कमी असल्यामुळे कालव्यावर अवलंबून असणारे शेतीतील पिके, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण स्वरुप धारण करत आहे.

    तसेच पाटबंधारे विभागातील राजकीय हस्तक्षेप थांबून कोर्टाच्या आदेश प्रमाणे कालव्यावर आरक्षित असलेले २.६७ टीएमसी पाणी नियमित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आवर्तन सुरळीत सुरु व्हावे, अन्यथा अजूनही भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांचा दृष्टीने कृष्णा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा.

    आत्ता पाण्याअभावी गहू, शाळू, उस, द्राक्ष व सर्व सोयाबीन व कडधान्य या पिकांचे नुकसान होत आहे, तरी २० फेब्रुवारी पर्यंत या महिन्यातील आवर्तन वसगडे पर्यंत आले पाहिजे, अन्यथा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने २० तारखेनंतर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.