नितीन देसाईंच्या आत्महत्येचे गूढ वाढले; ऑडिओ क्लीप्समध्ये आढळली महत्त्वाची माहिती, पीएम मोदी आणि शिंदेंसाठी मेसेज

Voice Recorder Of Nitin Desai : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर आता उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लीप्समध्ये महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या तपासात क्लिप्स गेमचेंजर फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे. या ऑडिओ क्लीप्समुळे देसाईंच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार आहे.

  मुंबई : चित्रपटसृष्टीतील सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे कर्जत येथील एन.डी. स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्या या धक्कादायक एक्झिटमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. खालापूर पोलिसांनी एन.डी. स्टुडिओतील नितीन देसाई यांचा मृतदेह खाली उतरवल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात केली. यावेळी पोलिसांना नितीन देसाई यांच्या मृतदेहाजवळ एक व्हॉईस रेकॉर्डर मिळाला होता. हा व्हॉईस रेकॉर्डरच नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीतील महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे.

  लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार :

  या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नितीन देसाई यांनी कुटुंबातील व्यक्तींबरोबरच आपल्या वकिलासाठी एक मेसेज रेकॉर्ड करून ठेवला आहे. या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये एकूण ११ ऑडिओ क्लीप्स आहेत. त्यापैकी एका ऑडिओ क्लीपमध्ये नितीन देसाई यांनी त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या गोष्टींविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे. ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ हे व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेले पहिले वाक्य आहे. यासोबतच नितीन देसाई यांनी एका क्लीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करीत त्यांच्याकडे एक विनंती केली आहे.

  एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका

  एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका. राज्य शासनाने या एनडी स्टुडिओचा ताबा घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य कलामंच उभारावे, अशी माझी इच्छा आहे. मराठी, हिंदी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. कारण एन.डी.स्टुडिओ हे नितीन देसाई म्हणून नाही तर एका मराठी माणसाने उभं केलेलं मोठं कलामंच आहे. आपण ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्याकडून फसवणूक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप नितीन देसाई यांनी केला. तसेच कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंना विनंती

  हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, यासाठी नितीन देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या मागण्यांसंदर्भात काय पावलं उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
  नितीन देसाईंच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार
  विधानसभेत गुरुवारी नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणाबाबत चर्चा झाली. यावेळी सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येत नितीन देसाई यांना न्याय देण्याची मागणी केली. नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओच्या ४३ एकर जमिनीवर १८० कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. या १८० कोटी रुपयांचे २५२ कोटी झाले. एडलवाईज समूहाचे सीईओ रसेश शहा यांच्या असेट रिक्रेशन कंपनीचे हे पहिले प्रकरण नाही. ही आधुनिक सावकारी आहे. असेट रिक्रेशन कंपनीने नितीन देसाई यांना दिलेल्या कर्जावर आकारलेल्या व्याजाचा दर आणि पद्धत याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.