मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक; मनोज जरांगेंनाही निमंत्रण

मराठा आरक्षण संबंधी मुंबई येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडणार असून, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना पत्र पाठवून या बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे.

    मुंबई : मराठा आरक्षण संबंधी मुंबई येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडणार असून, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना पत्र पाठवून या बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे. या विनंतीला अनुसरून मनोज जरांगे हे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी 2 वाजता ही बैठक होणार असून, यात मराठा आरक्षण विषयक परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
    शंभुराज देसाई यांचे जरांगेंना पत्र…
    मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या असणाऱ्या आग्रही भूमिकेच्या अनुषगांने या बैठकीस आपण उपस्थित राहून आपली भूमिका सांगावी. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षणाच्या बाजूने मांडावयाची आपली मते या बैठकीत सहभागी होऊन आपण मांडावीत. याकरिता सदर बैठकीस आपण उपस्थित राहावे, अशी विनंती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य शंभुराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना पत्राद्वारे केली.
    गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही…
    मुंबईत होणाऱ्या आंदोलनावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले आहे की, “मुंग्यासारखे मराठे घराच्या बाहेर पडणार आहे. सरकारने मारहाण केली केली किंवा गोळ्या घातल्या तरीही आरक्षणाच्या मागणीवरून मागे हटणार नाही. ज्या-ज्या वेळी मी बोलतो, त्या-त्या वेळी ते करतो. आता मुंबईला गेल्यावर माघार घेणार नाही. संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची माझी तयारी आहे. वेळप्रसंगी जीव देखील द्यायची तयारी आहे. मात्र, आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गोरगरीब मराठे मागे हटणार नाही असे जरांगे म्हणाले. त्यामुळे सरकारकडून आरक्षणाबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.