tuljabhavani

Tuljapur News : तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या नित्योपचारातील दागिने गाहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  तर काही दागिन्यांच्या वजनात तफावत असल्याचेही उघड झाली आहे. या घटनेमुळे राज्यभरातील भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.

  तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या (Tulja Bhavani) मंदिरातील सोन्याचा मुकूट, मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या अहवालात पुढे आली आहे . या घटनेमुळे राज्यभरातील भाविकांत खळबळ उडाली आहे. मंदिर संस्थानाने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली.
  तुळजाभवानीचे कोणते दागिने चोरीला? 
  27 अलंकारांपैकी (Jwellery) 4 अलंकार गायब, 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट, 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र, नेत्रजोड  आणि माणिक मोती, असे मौल्यवान दागिने गायब आहेत. मंदिर संस्थानाने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली 16 सदस्यांची समिती नेमली होती. या समितीच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे.
  बनावट मुकूट ठेवला
  धक्कादायक म्हणजे ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकूट ठेवण्यात आला. पुरातन पादुका काढून नव्या बसवण्यात आल्यात. देवीच्या शिवकालीन आणि पुरातन दागिन्यांची काही दिवसांपूर्वी मोजदाद करण्यात आली होती, याचा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. मात्र, या अहवालावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
  सोने-चांदीच्या शुद्धतेत तफावत
  दरम्यान, तुळजाभवानी मातेला अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या शुद्धतेतही प्रचंड तफावत आढळून आलीय. सोन्यात 50 टक्के तूट आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे देवीला वाहण्यासाठी आणलेल्या 4 तोळ्याचा सोन्याचा पादुका चक्क ताब्यांचं असल्याचं उघडकीस आल्याने खळबळ उडालीय. हा धक्कादायक प्रकार मंदिर संस्थानने आणलेल्या सोने, चांदी शुद्धता तपासणी मशीनमुळे उघडकीस आलाय.
  कायदेशीर कारवाई करण्यासाठी समिती गठीत
  देवीचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी समिती नेमण्यात आलीय. ही समिती तीन ते चार दिवसात अहवाल देईल. मात्र देवीचे दागिने चोरी झाल्यामुळे राज्यात आता चोरांना कुणाचाच धाक उरला नाहीये, चक्क देवाच्या दारात चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेलीय अशी चर्चा सुरु आहे.
  तुळजाभवानी मंदिराची महती
  तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे.