अर्थ खाते किती दिवस राहणार हे सांगणे अशक्य; अजित पवार यांचं मोठं विधान

'माझ्याकडे आज अर्थ खाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, यापुढे अर्थ खाते टिकेल की नाही हे सांगता येत नाही', असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

    पुणे : ‘माझ्याकडे आज अर्थ खाते आहे. त्यामुळे आपल्याला झुकते माप मिळते. पण, यापुढे अर्थ खाते टिकेल की नाही हे सांगता येत नाही’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड चर्चेसाठी अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

    पवार पुढे म्हणाले की, ‘मला या विषयावर काही बोलायचे नाही. मला विकासाबद्दल विचारा. मी विकासासाठी बैठका घेतो. माझे ध्येय फक्त विकास एके विकास एवढेच आहे. शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यांनी अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. प्रत्येकाला तक्रार करण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार आहे. कायद्याच्या चौकटीत बसवून त्यावर निर्णय देतील’.

    वाचाळवीरांची संख्या वाढतीये

    प्रत्येकाने बोलताना भान ठेवूनच बोलले पाहिजे. याबद्दल दुमत नाही. सध्या वाचाळवीरांची संख्या कमालीची वाढत आहे. असे असले तरी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे, असा चिमटा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना पवारांनी काढला.

    बारामतीला दिले प्राधान्य

    उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री असताना अनेक योजनांच्या फाईल्स आमच्यापुढे यायच्या. त्यात बघायचे कुठल्या. कुठल्या गावांची नावे आहेत. मग, बारामतीचे नाव नसेल, तर टाकायचे आणि सही करायची. अशा पद्धतीने आपल्याला 42 कोटी रुपयांचे मॅग्नेटचे काम मिळाले. यापुढेसुद्धा बारामतीच्या विकासाला प्राधान्य राहील.

    – अजित पवार, उपमुख्यमंत्री.