imtiyaaz jaleel

वयाच्या १८ व्या वर्षी देशाचा पंतप्रधान निवडू शकतो, मग लग्न कधी करायचे हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ( Prime Minister Narendra Modi) विचारला आहे.

    मुलींचं लग्नासाठीचं (Women Marriage Age Increased From 18 To 21) वय १८ वरून २१ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. त्यामुळे आता यासंदर्भातलं विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच (Parliament Winter Session) मंजुरीसाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्यावरून सध्या देशात मोठी चर्चा सुरू आहे. एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel On Marriage Age Of Women) यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी देशाचा पंतप्रधान निवडू शकतो, मग लग्न कधी करायचे हे सांगणारे तुम्ही कोण ? असा सवाल जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.

    इम्तियाज जलील म्हणाले, “मला मोदींना हा विचारायचं आहे की मुलींच्या लग्नासाठीचं वय वाढवून काय साध्य करणार आहेत? १८ वर्षांचं झाल्यावर मी देशाचा पंतप्रधान कोण होणार हे निवडू शकतो. आमदार-खासदार निवडू शकतो. १८ वर्षाचं झाल्यावर मी करारावर स्वाक्षरी करू शकतो. व्यवसाय सुरू करू शकतो. असं असताना केवळ लग्नासाठी हे विधेयक आणणं कितपत योग्य आहे ? सरकारचा यामागे काय तर्क आहे हे त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे.”

    “सरकारला आपल्या तरूण पीढित किती सामर्थ्य आहे, किती ऊर्जा आहे हे माहिती नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही १८ वर्षांचं झाल्यावर सर्व परवानग्या देत आहात मग लग्न कधी करायचं हे सांगणारे तुम्ही कोण ?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला.