अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो, पण…; सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल

पुरस्करांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने(ठाकरे गट) स्वातंत्र्यीवर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

    दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारकडून (Government) पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. यंदा मोदी सरकारने २५ जानेवारी रोजी एकूण १०६ पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. मोदी सरकारने एकूण १०६ पद्म पुरस्कारांपैकी ६ जणांना पद्मविभूषण, ९ जणांना पद्मभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यामध्ये १९ मान्यवर महिला आहेत. तर यामध्ये २ एनआरएय, परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या पुरस्करांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने(ठाकरे गट) स्वातंत्र्यीवर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

    ज्या मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना गोळया घालून ठार केलं, ज्या मुलायमसिंह यांना भाजपने ‘मौलाना मुलायम’ म्हणून हिणवलं त्याच मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदय सम्राटांना पुरस्कार देण्यात आला नाही. त्यांना मोदी सरकार विसरले. सावरकरांना पुरस्कार देण्यापासून मोदी सरकारला कोणी रोखले होते? असा संतप्त सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

    प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेकांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील अनेक नावे संघ परिवाराशी संबंधित आहेत. अर्थात त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रमेश पतंगे, भिकुजी इदाते यांचा सन्मान योग्यच आहे, असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे.

    मौलाना मुलायम म्हणून हिणवलं

    मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. हे आक्रितच म्हणावे लागेल. जिवंतपणी कारसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना भाजपने केली. त्यांना मौलाना मुलायम म्हणून हिणवलं. त्याच मुलायमसिंह यादव यांना भाजपने सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. प्रखर हिंदुत्ववादी मोदी सरकारने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मुलायमसिंह यादव यांना दिला, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

    …तर हिंदू रस्त्यावर उतरला नसता

    बाबरी मशिद पाडली त्यानंतर मुलासमय सिंह यादव यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता. त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपला झाला नसता. ते ऋण फेडण्यासाठीच मुलायम सिंग यादव यांना सन्मानित करण्यात आले काय? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

    सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले?

    बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर यांना भारतरत्नाने सन्मानित केले जाईल असे वाटत होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपाला वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? असा सवालही करण्यात आला आहे.

    तर ढोंग लपले असते

    बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणारे सरकार राज्यात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचा मोठा गाजावाजा केला. पण याच सरकारने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांच्या नावाची भारतरत्नासाठी शिफारस केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते, असा टोलाही लगावण्यात आला आहे.