
जुन्या वादातून हडपसर परिसरात सराईतांच्या टोळक्याने पुन्हा राडा घालत गोसावी वस्तीत एका तरूणासह त्याच्या वडीलांना लोखंडी हत्याराने मारहाण करत वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याची घटना घडली. टोळक्याने तब्बल २० ते २२ गाड्यांची तोडफोड केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
पुणे : जुन्या वादातून हडपसर परिसरात सराईतांच्या टोळक्याने पुन्हा राडा घालत गोसावी वस्तीत एका तरूणासह त्याच्या वडीलांना लोखंडी हत्याराने मारहाण करत वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याची घटना घडली. टोळक्याने तब्बल २० ते २२ गाड्यांची तोडफोड केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. हडपसर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी यश जावळे (वय २३), सुरज पंडीत (वय २९) व युवराज बदे यांना ताब्यात घेतले आहे. तर, त्यांच्या इतर ८ ते ९ साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत रोहीत भरत गायकवाड (वय २४, रा. गोसावी वस्ती, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रोहीत व जावळे यांच्यात पुर्वी वाद झाले होते. या वादातून जावळे याच्या मनात राग होता. दरम्यान, जावळे व त्याच्या साथीदारांनी बुधवारी पहाटे रोहीत व त्याच्या वडीलांना मारहाण केली. ठार मारण्याची धमकीही दिली. तर त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली. त्यानंतर टोळक्याने परिसरात लावलेल्या सर्व सामान्यांच्या वाहनांची तोडफोड केली. तसेच, हवेत हत्यारे फिरवून दहशत देखील माजवली. या टोळक्यांनी तब्बल २२ हून अधिक वाहनांची तोडफोड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीचे सत्र थांबलेले असताना आता ते पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे.