कल्याण डोंबिवलीत बूस्टर डोसबाबत नागरिक उदासीन, फक्त १५ टक्के नागरिकांनी घेतला बूस्टर डोस

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोराेनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या पाच आहे. मात्र त्यापैकी एकही रुग्ण नव्या व्हेरियंटचा नाही. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

    कल्याण-डोंबिवली : देशासह राज्यभरात काेरोनाच्या जेएन-१ या नव्या व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. कल्याण डोंबिवलीत या व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र जेएन-१ या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे आरोग्य खाते अलर्ट झाले आहे. कोरोनासाठी संजीवनी ठरलेला बूस्टर डोसकडे मात्र नागरिकांनी पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून दिसून येतं आहे. महापालिका हद्दीत आत्तापर्यंत १ लाख ७३ हजार ९३ जणांनी कोरोनाचा बूस्टर डोस घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात बूस्टर डोस घ्यावा असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केलं आहे.

    कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोराेनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या पाच आहे. मात्र त्यापैकी एकही रुग्ण नव्या व्हेरियंटचा नाही. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. महापालिकेच्या रुक्मीणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी दहा बेडचे आयसोलेशन वॉर्ड सुरु करण्यात आले आहेत. तूर्तास लागण झालेल्या पाचही रुग्णांवर घरात विलगीकरण करुन त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी प्रसाद बोरकर यांनी दिली आहे. सध्या महापालिकेच्या विविध नागरीक आरोग्य केंद्रावरुन बूस्टर डोस दिला जात आहे. मात्र बूस्टर डोस घेण्याबाबत नागरीक उदासीन असल्याचे आकडेवारी वरून दिसून येतं आहे.

    महापालिका हद्दीतील ११ लाख ४२ हजार ३७५ जणांनी काेरोनाचा पहिला डोस घेतला आहे. पहिल्या डोसची टक्केवारी ७३ टक्के आहे. तर ११ लाख १ हजार २१८ जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. दुसऱ्या डोसची टक्केवारी ९६ टक्के आहे. बूस्टर डोस केवळ १ लाख ७३ जार ९३ जणांनी घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही डोसच्या तुलनेत बूस्टर डोसची टक्केवारी अवघी १५ टक्के आहे. दुसऱ्या लाटेनंतर लसीकरण थंडावले. ते आजही थंडावलेलेच आहे. नव्या व्हेरीयंटमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये त्रिसूत्रीचे पालन करावे, लक्षण दिसल्यास तात्काळ डॉक्टराशी संपर्क साधावा, बूस्टर डोस घ्यावा असे आवाहन केलं आहे.