कणकवलीत सावडाव धरण प्रकल्पग्रस्त आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे केली मागणी

मनोज पाटील यांनी या संदर्भात पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

    कणकवली : सावडाव धरण दोनचे काम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक प्रकल्पग्रस्तास त्यांच्या जमिनीचा मोबदला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात येणार होता. मात्र, तो अद्याप पर्यंत न मिळाल्याने तसेच या संदर्भात लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी न दिल्याने सावडाव धरण प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले. त्यांनी शुक्रवारी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून निवेदन देण्यात आले. यावर मनोज पाटील यांनी या संदर्भात पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

    सावडाव धरण प्रकल्पग्रस्त दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे की, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सावडाव धरण 2 चे उ‌द्घाटन झाल्यावर एक महिन्यांच्या आत प्रत्येक प्रकल्पग्रस्तास त्यांच्या भूसंपादित जमिनीतील झाडे, बांधकाम, विहीर, जमिनीतील इतर बाबींचा तसेच जमिनीचा किती, कधी आणि कोणत्या प्रकारे मोबदला मिळणार याबाबत लेखी स्वरूपात पत्र देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न करताच धरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर कामास आम्हा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता ठेकेदाराला हाताशी धरून फोंडाघाट मृद आणि जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. शिरोडकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण आणि घुसखोरी करून परस्पर धरणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे श्री. शिरोडकर आणि ठेकेदारा विरोधात तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे. काय‌द्याने आमच्या मालकीच्या जमिनीचे संरक्षण करण्याचे अधिकार आम्हाला मिळालेले आहेत.

    आमच्या जमिनीत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्या विरोधात आपणाकडून गुन्हे दाखल न झाल्यास, आमच्या जमिनीचे संरक्षण करताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी सावडाव ग्रामस्थ वैभव सावंत, नयना सावंत, विष्णू झगडे, आनंद नरसाळे, विद्याधर वारंग, संभाजी तेली, बाळकृष्ण चव्हाण, संदीप खांदारे, सतीश मोरे आदी उपस्थित होते.