खानापूरमध्ये २७ जनावरांना लम्पीची बाधा ; १७ हजार ३७१ जनावरांना लसीकरण 

गोठे स्वच्छ ठेवण्याचे पशुसंवर्धनतर्फे आवाहन

  विटा :खानापूर तालुक्यातील २४ गायी व ३ बैलांना लम्पीची बाधा झाली आहे.  तर एका जनावराचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील पशुसंवर्धक शेतकरी चिंतेत आहेत.

  लम्पीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील १७ हजार ३७१ जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. लम्पीला प्रतिबंध घालण्यासाठी शेतकऱ्यांनी जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. गोचीड, रक्त पिणााऱ्या किटकापासून गायी, बैलांना लम्पीची बाधा होते. लोकांनी आप आपल्या स्तरावर जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता व लम्पी होणाऱ्या किटकांची उत्पत्ती थांबविणे आवश्यक आहे. शहरी भागापेक्षा वाड्यावस्त्यांवर किटक जास्त असतात. अशावेळी गोठ्यात औषध फवारणी व रात्री धूर करून अशा किटकापासून जनावरांचा बचाव केला पाहिजे. लम्पीमध्ये जनावरांच्या छाती व पायांच्या सांध्याला सुज येते. पायांना सुज आल्यामुळे जनावरांना बसता येत नाही. आठ ते दहा दिवस जनावरे बसली नाहीत तर त्यांच्या पायावर ताण येऊन ती मृत होतात. त्यामुळे जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांच्या डोळ्यातून पाणी येणे, अंगावर बारीक गाठी उठणे अशी लम्पीची लक्षणे आहेत. सध्या गायी, बैलांचे बाजार बंद आहेत. तरीही काहीजण अन्य जिल्हा व तालुक्यातून घरगुती जनावरे खरेदी करत आहेत. जनावरांना लसीकरण केल्याशिवाय ती आणू नयेत. लम्पी हा रोग विषाणूजन्य आहे.

  जनावरे एकमेकांच्या संपर्कात आले तरी रोग होऊ शकतो. हा रोग आटोक्यात येण्यास वेळ लागतो. पशुधन विभागातर्फे लसीकरण यासह लम्पी प्रतिबंधासाठी प्रयत्न सुरू आहेत. पशुपालकांनीही सहकार्य करावे

  -डॉ. सईद मणेर, खानापूर तालुका पशुसंवर्धन अधिकारी विटा.

  शेतकऱ्यांनी काय करावे
  गोठे स्वच्छ ठेवावेत, जनावरांची परजिल्हा, तालुक्यात वाहतूक करू नये, जनावरांच्यावर प्राथमिक उपचार करून घ्यावेत, लम्पी झालेली जनावरे निरोगी जनावरांपासून दूर ठेवावीत, औषध फवारणी करून रक्त पिणारे गोचीड, किटकांची उत्पत्ती थांबवावी.