मावळ लोकसभा मतदारसंघात लढत शिवसेनेच्या दोन गटातच; बारणेंच्या हॅटट्रिकची उत्सुकता, शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिहार्यतेतून

त्यामुळे सुनेत्रा पवार यांची निवडणूक पडद्याआडून लढवणारे पार्थ अजित पवार आपल्या वडीलांसह मावळ मतदारसंघांसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत असे दिसून येते

  दीपक मुनोत – पुणे : देशभरात प्रसिद्ध असलेल्या पवार घराण्याला पहिल्या पराभवाची चव मावळ लोकसभा मतदारसंघातून मिळाली. २०१९चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मातोश्री आता लगतच्या बारामती मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मावळात महायुतीला दगाफटका झाला तर त्याचे पडसाद बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा उमटू शकतात. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची निवडणूक पडद्याआडून लढवणारे पार्थ अजित पवार आपल्या वडीलांसह मावळ मतदारसंघांसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत असे दिसून येते.

  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लढत झालेल्या या मतदारसंघात आता शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. प्रत्येकी तीन-तीन विधानसभा मतदारसंघ खंडाळा घाटाखाली आणि घाटावर असलेल्या मावळ लोकसभेच्या मतदारसंघात भाजपचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे ६ आमदार असणे ही महायुतीसाठी जमेची बाजू आहे.

  मावळ मतदारसंघ नव्याने निर्माण झाल्यानंतर आतापर्यंतच्या तिन्ही लढती या घाटावरील उमेदवारांत होऊन घाटावरचाच खासदार तेथे झाला आहे. २०२४ ही त्याला अपवाद नाही. महापालिका आणि तत्सम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसणारे नात्यागोत्याचे राजकारण लोकसभेलाही होणार आहे. श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे दोन्ही उमेदवार मराठा असून त्यांची गावकी, भावकी मोठी आहे. त्याचा मोठा परिणाम यावेळच्या मावळच्या निवडणुकीत दिसून येणार आहे.

  मावळ लोकसभा मतदारसंघात मावळ, लोणावळा आणि कर्जतचा बहुतांश भाग डोंगराळ व दुर्लभ आहे. त्यामुळे फूट पडण्यापूर्वीच्या राष्ट्रवादीची ताकद असूनही तो एकसंध राखता आला नाही. याउलट शिवसेनेला याचा नेमका फायदा झालेला आहे. त्यामुळेच स्वतः उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. सहानुभूतीचे रुपांतर मतदानात करुन घेण्याचे आव्हान महाविकास आघाडी कसे पाडणार याबाबत साशंकता आहे. तर बदललेल्या राजकारणात मावळते खासदार श्रीरंग बारणे विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी आगेकूच करत आहेत.

  पिंपरी-चिंचवड शहरासह मावळात राष्ट्रवादीची ताकद आहे. मात्र राष्ट्रवादीच्या विभाजनामुळे राजकीय समीकरणे काहीशी बदलली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मावळमध्ये राजकीय बदल घडले. शरद पवार यांचे नेतृत्व मानणारा मोठा मतदार वर्ग या संपूर्ण मतदारसंघात आहे. तथापि, सहानुभूतीचे रुपांतर मतदानात करुन घेण्याचे मोठे आव्हान त्यांच्या पक्षांसमोर आहे कारण घरोघरी जाऊन प्रचार करणारे कार्यकर्ते मोजक्या संख्येने असणे ही कमतरता आहे.

  श्रीरंग बारणे एकनाथ शिंदेंचे समर्थक आहेत. विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून बारणे यांनी ७,२०,६६३ मते मिळवून विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे पार्थ अजित पवार यांच्या बाजूने ५,०४,७५० मते पडली. बारणे यांनी २,१५,९१३ मतांनी दणदणीत विजय मिळवला.

  मावळ तालुक्यात दीर्घ काळाने इतिहास घडून बाळा भेगडे यांचा पराभव झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके निवडून आले. तरीही मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या वाढदिवशी ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंग्जमध्ये भावी खासदार असा त्यांचा उल्लेख केल्याने भेगडे यांना मावळ लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक आग्रही असल्याचे दिसून आले होते. मात्र त्यांचा विरोध आता मावळला आहे. ते सुद्धा शंभर टक्के महायुतीच्या प्रचारात आहेत.

  मावळमध्ये अजित पवार यांची आपली स्वत:ची वेगळी ताकद आहे. मावळ तालुक्यातील आमदार सुनील शेळके त्यांचे कट्टर समर्थक आहेत.‌ अजित पवार यांच्या ताकदीविषयी शेळके सांगत असतात. ते स्वतः हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. आता या घडीला बारणे यांना अजित पवार गटाची साथ मिळाली असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

  महाविकास आघाडीने संजोग वाघेरे यांची उमेदवारी आधीच जाहीर करुन आघाडी घेण्यासाठी प्रयत्न केला. खरे तर महाविकास आघाडीला उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागली होती. ही जागा ठाकरे गटाला सुटल्याने महाविकास आघाडीने अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर, पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. लढत सोपी नसली तरी अवघड नक्कीच नाही, असा विश्वास वाघेरे व्यक्त करताना दिसतात.

  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी संधी न मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीत गेलेल्या, कर्जत येथील माधवी जोशी यांनी बुधवारी मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. जोशी या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. आता माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत दिसत आहे.