संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पिंपरी चिंचवड मधील मोशीमध्ये शुक्रवारी सकाळी 7 वाजता दोन कंपन्यांना भीषण आग लागली. या आगीत दोन्हीही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कंपनी मालकांच्या म्हणण्याप्रमाणे अंदाजे एकूण 3.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील मोशीमध्ये शुक्रवारी सकाळी 7 वाजता दोन कंपन्यांना भीषण आग लागली. या आगीत दोन्हीही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कंपनी मालकांच्या म्हणण्याप्रमाणे अंदाजे एकूण 3.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन सिलेंडरचे स्फोट झाल्याने ही आग लागली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख अग्निशमन विमोचक बाळासाहेब वैद्य यांनी दिली.

    ही आग ‘अमिगा टेकनॉक्राफ्ट’ आणि ‘एसपीए इंजिनीरिंग’ या दोन कंपन्यांना लागली होती. त्याबद्दल एका व्यक्तीने सकाळी 7 वाजता अग्निशमन विभागाला फोन करून कळवले. या कंपन्या पुणे-नाशिक हायवेवरील जय गणेश साम्राज्य चौककडून चऱ्होलीला जाणाऱ्या रस्त्याजवळ आहेत. ही आग भीषण असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे 7 बंब घटनास्थळी पोहोचले होते. यामध्ये मुख्य केंद्राचे 2 बंब व भोसरी, प्राधिकरण, तळवडे, चिखली व थेरगाव केंद्राचे प्रत्येकी एक बंब होते. तसेच, 22 ते 23 कर्मचारीही होते.

    अमिगा टेकनॉक्राफ्ट कंपनीमधील मशीनरी, लॅपटॉप्स, कॉम्प्युटर्स, इलेक्ट्रिकल वायरिंग व इतर साहित्य जळून खाक झाले. कंपनीचे मालकानुसार अंदाजे 1.5 कोटीचे नुकसान झाले आहे. तर, एसपीए इंजिनीरिंग कंपनीमधील मशीनरी, लेथ मशीन, ड्रिलिंग मशीन, सिएनसि मशीन, व्हीएमसि मशीन, तयार माल व कच्चा माल जळून खाक झाला आहे. कंपनी मालकानुसार या आगीत त्याचे अंदाजे 2 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

    अग्निशमन विभागाचे कर्मचारी या कंपनीबाहेर पोहोचताच आणखी दोन सिलेंडरचे स्फोट झाले. यातील एक सिलेंडर कंपनीचे शेडचे छत तोडून 200 ते 250 मीटर दूर उडून पुणे-नाशिक हायवेजवळ पडला. कंपनीबाहेर पार्क केलेली MH14 DQ 9265 या दुचाकीला आग लागून ती खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.