प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

चालू वर्षी थंडीचे प्रमाण कमी अधिक होत असले तरी रब्बीची पेरणी मात्र वेगात सुरू आहेत. पुणे विभागात रब्बी हंगामातील सरासरी ५५  टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. आत्तापर्यंत सरासरीच्या ११ लाख ४९ हजार २६६ हेक्टर पैकी सहा लाख २८ हजार ६७०  हेक्टर म्हणजेच सरासरी ५५  टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

    रांजणी : लवकर पेरण्या झालेल्या ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत असल्याचे चित्र दिसून येते.चालू वर्षी १५  ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या पावसाचा जोर पसरल्यानंतर रब्बी हंगामातील पेरण्यांची सुरुवात झाली. पुणे विभागातील चित्र पाहिले तर ज्वारी, तीळ, जवस,गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत तर काही ठिकाणी बाजरी पिकाची काढणी देखील सुरू झालेली असून जवळ जवळ ९७  टक्के बाजरी पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात सोयाबीणचे पीक गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सोयाबीन पिकाची काढणी देखील सुरू असून जवळजवळ सोयाबीनची काढणी पूर्णत्वास आली आहे.
    -जिल्ह्यात ९०  हजार ४९१ हेक्टरवर  पेरणी
    कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील दोन लाख २९ हजार ७२२ हेक्टर क्षेत्रापैकी ९०  हजार ४९१ हेक्टर क्षेत्र पेरणी झाली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील भात पिकाची काढणी देखील जवळजवळ संपुष्टात आली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत आहे, तर हरभरा, गहू या पिकांची उगवण झाली असून हि पिके खुरपणीच्या अवस्थेत आहे. एकूणच पुणे विभागात चालू वर्षीचे पाणी सिंचनाचे चित्र पाहिले तर यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना मुबलक पाणी मिळू शकते. थंडीचा जोर कमी अधिक होत असला तरी पेरण्या मात्र वेगात सुरू आहेत. गेल्या दोन-तीन वर्षाच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहू आणि हरभरा पीक घेतले जात असल्याचे चित्र पहायला मिळते.
    -ज्वारी,  हरभरा, मका जोमात
    दरम्यान जिल्ह्यामध्ये पडलेला सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साठुन राहिल्याने रब्बी हंगामातील पेरणीत काही काळ खंड निर्माण झालेला होता. परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यातील पेरणीची कामे प्रगतीपथावर आहेत. रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा या पिकांबरोबरच मकाचे पीक देखील चांगल्या अवस्थेत आहे