उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरुन सुप्रिया सुळे आक्रमक; गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

उल्हासनगरमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडने शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणावर राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

    पुणे : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Firing) वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या केबिनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडने (Ganpat Gaikwad) शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. यामुळे राज्यामध्ये राजकीय वादंग निर्माण झाला असून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. या प्रकरणी गणपत गायकवाडसह तिघांना अटक केली. या प्रकरणावर राष्ट्रवादी (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Home Minister Devendra Fadnavis) राजीनाम्याची मागणी केली आहे.

    सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या, उल्हासनगर येथील घटना पाहिल्यावर एकच दिसून येते की भाजपला सत्तेची आणि पैशाची मस्ती आली आहे. त्यांचे आमदार म्हणतात पोलिसांना मारा, आता तर त्यांचेच आमदार पोलिस स्टेशनमध्ये अधिकार्‍यांसमोर गोळीबार करतात. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नाही. आज आपापसात सुरू आहे. उद्या तुम्हाला आणि मला हे लोक गोळ्या मारतील. त्याच बरोबर राज्याच्या गृहमंत्र्यांचं हे अपयश असून महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू आहे. या प्रकरणा विरोधात मी दिल्लीत आवाज उठविणार असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना दिली.

    त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन देखील उल्हासनगर मधील गोळीबाराचा निषेध दर्शवला आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेशी खेळ करण्याचं ओपन लायसन्स गृहमंत्री महोदयांनी भाजपाच्या नेत्यांना दिलंय का? पुण्यात भाजपाचे आमदार पोलीसांच्या श्रीमुखात भडकावितात आणि उल्हासनगरमध्ये माजी नगरसेवकांवर गोळीबार करतात. भरीत भर म्हणजे गोळीबार करणारे भाजपा आमदार ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यावर राज्यात गुंडगिरीच वाढणार’ असा थेट आरोप करतात. हा आरोप अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात भाजपाचे खुले ‘गुंडाराज’ सुरु आहे आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हाताची घडी तोंडावर बोट ठेवून शांतपणे हे सगळं पाहत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेची गांभिर्याने दखल घेऊन महाराष्ट्र सरकार तातडीने बरखास्त करायला हवे. शांतताप्रिय सुसंस्कृत महाराष्ट्रात अशी गुंडगिरी खपवून घेता कामा नये. असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला असून याबद्दल दिल्लीमध्ये आवाज उठवणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.