पुण्यात राज ठाकरेंची सभा; जाणून घ्या वाहतूकीतील महत्त्वाचे बदल आणि पर्यायी रस्ते

पुण्यातील सारसबाग येथे मध्यवर्ती भागामध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

    पुणे : लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. येत्या दोन दिवसांमध्ये पुण्यातील प्रचारतोफ थंडावणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवल्यानंतर राज ठाकरे यांची पुण्यामध्ये सभा पार पडणार आहे. आज (दि.10) पुण्यातील सारसबाग येथे मध्यवर्ती भागामध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

    पुण्यामध्ये महायुतीकडून मुरधीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोहोळ यांचा जोरदार प्रचार देखील सुरु आहे. मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामध्ये येणार आहेत. राज ठाकरे यांची पुण्यातील सभा ही स्वारगेट जवळ असणाऱ्या सारसबाग येथे होणार आहे. सभेचे ठिकाण शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असल्यामुळे आणि सभा ही राज ठाकरे यांची असल्यामुळे सभेला तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. सभेला होणारी गर्दी लक्षात घेता सिंहगड रस्त्यावरून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

    ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर

    सारसबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थळी जावे. बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक, सावरकर पुतळा चौक, सिंहगड रस्ता, दांडेकर पूल चाैकमार्गे इच्छितस्थळी जावे. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक, दांडेकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. सातारा रस्ता, शंकरशेठ रस्त्याने बाजीराव रस्त्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक, मित्रमंडळ चौक, दांडेकर पूलमार्गे इच्छितस्थळी जावे.