ग्रामीण पातळीवर विविध योजना प्रभावीपणे राबविल्या : सुशील संसारे

पंचायत समितीने तालुक्यात खूप चांगले काम केले आहे. यापूर्वी पंचायत समितीला २०१९-२० मध्ये राज्यातील दुसरा व पुणे विभागातील प्रथम क्रमांकाचा यशवंत पुरस्कार, राज्य पुरस्कृत योजनेतील महाआवास टप्पा एक साठीचा राज्यात तिसरा तर पुणे विभागात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

  कागल : मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या प्रयत्नातून पंचायत समितीला भरघोस निधी प्राप्त झाला आहे. ग्रामीण जीवन उंचावण्यासाठी पंचायत समितीने ग्रामीण पातळीवर विविध योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्यामुळेच पंचायत समितीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या योजनांची जनजागृती व्हावी. तसेच योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. भविष्यातही पंचायत समिती राबवित असलेल्या विविध शासकीय योजनांचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांनी केले.

  पंचायत समितीच्या विविध विभागातुन राबविण्यात येणाऱ्या योजना व इतर माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत गटविकास अधिकारी संसारे बोलत होते.

  यावेळी शिक्षण, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, बचत गट, आरोग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला बालकल्याण प्रकल्प, घरकुल आदी विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाच्या वतीने राबवीत असणाऱ्या योजना, पूर्ण झालेली व सुरू असणारी कामे यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.

  संसारे पुढे म्हणाले, पंचायत समितीने तालुक्यात खूप चांगले काम केले आहे. यापूर्वी पंचायत समितीला २०१९-२० मध्ये राज्यातील दुसरा व पुणे विभागातील प्रथम क्रमांकाचा यशवंत पुरस्कार, राज्य पुरस्कृत योजनेतील महाआवास टप्पा एक साठीचा राज्यात तिसरा तर पुणे विभागात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भविष्यात पंचायत समितीला काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.

  गेल्या पूरपरिस्थितीत ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांना ग्रामनिधीतून योजना राबविण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. त्याही योजना चांगल्या राबविल्या आहेत.

  बालस्नेही पंचायत प्रकल्प ही योजना युनिसेफ आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने सुरू आहे. तसेच विधवा महिलांसाठी सन्मान योजना असून, तालुक्यातील ९० टक्के ग्रामपंचायतींनी या बाबतचे ठराव केले आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायतीही असे ठराव करत आहे. या योजनेअंतर्गत अर्जुनी ग्रामपंचायतीने विधवा महिलांसाठी समान काम, समान वेतन असा ठराव केला आहे.

  सर्वसामान्यांसाठी घर हा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. पंचायत समितीने घरकुलाच्या विविध योजनेतून लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ दिला आहे. त्यामुळे ते लोक संतुष्ट आहेत, असेही ते म्हणाले.