भविष्यात पक्षीय मतभेद संपुष्टात आणून, एकत्रितपणे विकासाभिमुख वाटचाल करू; अजित पवार यांची ग्वाही

विष्यात पक्षीय मतभेद संपृष्टात आणून इंदापूर शहराचा आणि तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने मी पुढाकार घेईन, याबाबत सर्व प्रमुखांशी, संबंधितांशी चर्चा करून त्यांचाही दृष्टीकोन समजून घेईन, एकत्रितपणे विकासाभिमुख वाटचाल करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

    इंदापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : भविष्यात पक्षीय मतभेद संपृष्टात आणून इंदापूर शहराचा आणि तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीने मी पुढाकार घेईन, याबाबत सर्व प्रमुखांशी, संबंधितांशी चर्चा करून त्यांचाही दृष्टीकोन समजून घेईन, एकत्रितपणे विकासाभिमुख वाटचाल करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

    इंदापूर येथील जुन्या बाजार समितीच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी, कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करत होते. मेळाव्यासाठी सुनेत्रा पवार, माजी राज्यमंत्री आणि आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सुरेश घुले, पीडीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, राजेंद्र तांबिले, श्रीमंत ढोले, प्रतापराव पाटील, किरण गुजर, दशरथ डोंगरे, प्रशांत पाटील, बाळासाहेब करगळ, जय पवार, श्रीराज भरणे, बाळासाहेब ढवळे, दीपक जाधव आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

    अजित पवार म्हणाले, तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी विराजमान व्हावे, हे देशातील ६५ टक्के जनतेच्या मनात आहे. यासाठी लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या पाहिजेत म्हणून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये सुसंवाद ठेवावा. आपल्या कार्यालयामध्ये घटक पक्षाचे कार्यकर्ते आले पाहिजेत. घटक पक्षाच्या कार्यालयात जाण्यास काही हरकत नाही. एकमेकांचा मानसन्मान ठेवा. कारण लोकसभेच्या चारशे जागा निवडून आल्या पाहिजेत. त्यासाठी इंदापूर तालुक्यातील चांगलं काम झाले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे अनेक विकास कामे मार्गी लागली जात आहेत.

    पवार पुढे म्हणाले, ३३ वर्षे झाली मी प्रतिनिधित्व करत आहे. १९९१ साली इंदापूर तालुक्यातील जनतेने पाठिंबा दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीत मला मोठे मताधिक्य मिळाले होते. महायुतीच्या वतीने जो कोणी उमेदवार दिला जाईल, त्याला भरघोस मताधिक्याने निवडून दिले पाहिजे. साखर कारखान्यांचा तीस वर्षांपासून प्रलंबित असलेला आयकर कराचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोडवला. जर महायुतीचा बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जिंकून आला तर अनेक विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून घेता येईल. महाआघाडीचे सरकार गेल्यानंतर जवळपास एक वर्ष सत्तेमध्ये आपण नव्हतो, त्यावेळी विकासकामे थांबली.

    तसेच अनेक विकासकामे स्थगित राहिली होती, असे सांगून पवार पुढे म्हणाले, मी तुमच्या कामाचा माणूस आहे. आपल्या पदाचा उपयोग जनतेसाठी झाला पाहिजे. लोकसभा व विधानसभा निवडणुका महायुती सोबतच लढवायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या आपण लढणार आहोत. भूतकाळामध्ये काय घडले ते सोडून दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. महायुतीचा उमेदवार विजय होईल, असे कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन पवार यांनी केले.