
द्राक्ष बागायतदार हा मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या दुष्टचक्रात यंदा अडकला आहे. या पार्श्वभूमीवर हाेणाऱ्या कापसेवाडी येथे हाेणाऱ्या शेतकरी मेळाव्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कुर्डुवाडी : गेल्या हंगामापासून द्राक्षाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यातच द्राक्ष बागायतदारांनी बेदाणाही मोठ्या प्रमाणावर उत्पादित केला आहे, आणि तो योग्य भाव नसल्याने तसाच सोलापूर, पंढरपूर, करकंब, सांगोला, सांगली व इतर कोल्ड स्टोरेजमध्ये अद्याप पर्यंत पडून आहे. परिणामी यामुळे द्राक्ष बागायतदार हा मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या दुष्टचक्रात यंदा अडकला आहे. या पार्श्वभूमीवर हाेणाऱ्या कापसेवाडी येथे हाेणाऱ्या शेतकरी मेळाव्याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
येथील कृषीनिष्ठ परिवाराने सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण आमदार, खासदार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री व तेलगणातील मुख्यमंत्र्यांना भेटून बेदाणाचा समावेश शालेय पोषण आहारात करावा, अशी मागणी लावून धरली, परंतु त्याला अद्यापपर्यंत यश आले नाही.
कापसे म्हणाले. मागील वर्षी पावसाळा हंगाम चांगला झाल्यामुळे अनेक ठिकाणी द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. परिणामी द्राक्षाला पंधरा ते विस रुपये किलो दर मिळाला. त्यामुळे हवालदिल झालेल्या द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षाचा बेदाणा तयार करण्यावर भर दिला. सन २०२१-२२ या वर्षांमध्ये १ लाख ९७ हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते, तर मागील वर्षी २०२२-२३ मध्ये तयार केलेला बेदाणा विक्री करुन सुध्दा २ लाख ३१ हजार टन बेदाणा विवीध कोल्ड स्टोरेज मध्ये अद्यापही शिल्लक आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च १२० रुपये तर दर १०० रुपये मिळत आहे.
कापसेवाडी हाेणार शेतकरी मेळावा
या प्रश्नाबाबत माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासादर शरद पवार यांनी भेटायला गेलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सकारात्मकता दर्शवून स्वतःच कापसेवाडी (ता. माढा) येथील शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या २३ ऑक्टोबरच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे जाहीर केले. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे, अशी माहिती कृषीनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे यांनी दिली.
हमी भावासाठी एकत्र येणे गरजेचे
यंदाच्या हंगामात द्राक्षाचे व बेदण्याचे माेठे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यामुळे बेदाण्याला ५० रुपये अनुदानाची मागणी या सभेत करण्यात येणार आहे. यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे हमी भावासाठी द्राक्ष उत्पादकांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे कापसे यांनी सांगितले.