अहमदनगर ते आष्टी रेल्वे मार्गाचं उद्घाटन; आजपासून ‘डेमू रेल्वे’ सेवेला सुरुवात

    मागील अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्याला (Beed) ज्या रेल्वेची प्रतीक्षा होती अशा बहुप्रतीक्षित अहमदनगर-बीड-परळी या (Ahmednagar to Ashti railway line) रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अश्या ‘डेमू रेल्वे’ सेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी पारपडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावून या रेल्वे मार्गाचे उदघाटन केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे , खासदार प्रीतम मुंडे, बाळासाहेब विखे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वे मार्गावरील चाचणी पूर्ण झाली होती. त्यामुळे प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे बीडवासीयांचे लक्ष लागले होते. मात्र आता बीड वासियांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. २६१ किमी अंतराच्या या एकूण प्रकल्पापैकी अहमदनगर ते आष्टी या ६७ किमी अंतरावर आजपासून डेमो रेल्वे धावण्यास सुरुवात झाली आहे. अहमदनगर ते आष्टी या मार्गावर आज पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी धावली.

    रेल्वे मार्गामुळे उद्योगधंद्याला चालना मिळणार : 

    आष्टी-अहमदनगर रेल्वे मार्गामुळे व्यापारी वर्गाला मुंबई, पुणे, दिल्ली, इंदोर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी, जामखेड, कर्जत, पाटोदा, शिरूर, बीड इत्यादी तालुक्यातील नागरिकांना पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.