कल्याणमध्ये महायुतीच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण हे ठरत नव्हतं, जेव्हा ठरवलं त्यांच्यावर पण विश्वास नाही, अशी परिस्थितीत त्यांच्यावर आली आहे.

    कल्याण : श्रीकांत शिंदे यांच्या निवडणूक कार्यालयाचे कल्याण पूर्वेत उद्घाटन करण्यात आले, या उद्घाटन प्रसंगी श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटासह इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण हे ठरत नव्हतं, जेव्हा ठरवलं त्यांच्यावर पण विश्वास नाही, अशी परिस्थितीत त्यांच्यावर आली आहे. त्यांना कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर नेत्यांवर कधीच विश्वास नव्हता, त्यांचा फक्त स्वतःच्या परिवारावरच विश्वास आहे, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. कल्याण लोकसभा मतदार संघातील महायुतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलाने काम करीत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

    कल्याण पूर्वेतील मतदात्यांना संपर्क साधता यावा आणि कार्यकर्त्यांनाही एकमेकांशी संपर्क साधता यावा यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या ‘हायटेक’ कार्यालयाच्या उद्घाटन समयी उपस्थितांना संबोधीत करतांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात माझ्या माध्यमातून मतदार संघात केलेल्या विकासकामांची माहिती घराघरात पोहचविण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने युतीतील प्रत्येक घटक पक्षाचा कार्यकर्ता हा उत्साहाने काम करीत आहे, परंतु हाच उत्साह येत्या २० तारखे पर्यंत कायम राहिला पाहिजे याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.

    भाजपा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांनी शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवारावरच त्यांच्या पक्ष श्रेष्ठींचा विश्वास नसल्याने दुसरा उमेदवार उभा केला होता असा दावा आपल्या भाषणात केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अप्पा शिंदे यांनी सांगितले की, विजय हा डॉ. श्रीकांत शिंदे यांचाच आहे. परंतु गेल्या दोन वेळेपेक्षा जास्तीत जास्त मताधिक्य गाठण्यासाठी सर्वांनी सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे असे सांगितले.

    या उद्‌घाटन सोहळ्यास माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, उपजिल्हा प्रमुख रमाकांत देवळेकर, विधानसभा समन्वयक प्रशांत काळे, भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, कल्याण पूर्व भाजपा कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, माजी नगरसेवक निलेश शिंदे, नवीन गवळी, रिपाइंचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे यांच्यासह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.