Vedic Research Board

  पुणे : वेदपाठाचे जतन करण्यासाठी परंपरेने केलेला पदपाठ हा पहिला प्रयत्न आहे. या दुर्मिळ विषयावर प्रकाश टाकणारी एक आगळी-वेगळी कार्यशाळा वैदिक संशोधन मंडळ (आदर्श संस्कृत शोध संस्था) पुणे येथे आज दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू झाली. वैदिक मंत्रांच्या गजरात दीपप्रज्वलन करून या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. सुब्रह्मण्य विरिवेंटि, प्रभारी निदेशक, वैदिक संशोधन मंडळ यांच्या स्वागतपर भाषणाने मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ. ओंकार जोशी यांनी अतिथींचा परिचय केला.

  संबंधित विषयांवर आवश्यक संशोधनासाठी उपस्थितांना प्रेरणा

  माननीय प्राध्यापक वसिष्ठ नारायण झा, भूतपूर्व संचालक संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांनी आपल्या बीजभाषणात पदपाठाशी संबंधित विषयांवर आवश्यक संशोधनासाठी उपस्थितांना प्रेरणा दिली. ऋग्वेदपदपाठ या विषयावर संशोधन करून पदपाठ या विषयात पीएचडी उपाधी मिळविणारे ते प्रथम संशोधक होते.

  व्याकरणशास्त्र व इतर विद्याशाखांचेही ज्ञान आवश्यक

  आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, पदपाठ हा सामान्य पाठ नसून, पदपाठाच्या अभ्यासासाठी संस्कृतभाषेबरोबरच व्याकरणशास्त्र व इतर विद्याशाखांचेही ज्ञान आवश्यक आहे. तैत्तिरीयपदपाठ या विषयात संशोधन करून पीएचडी मिळविणाऱ्या कार्यशाळेच्या मुख्य अतिथी आणि मुख्यशिक्षिका प्रा. निर्मला कुलकर्णी यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्दिष्ट्ये सांगितली.

  कार्यशाळा विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना अत्यंत उपयुक्त

  ही कार्यशाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना अत्यंत उपयुक्त आहे हे स्पष्ट केले. त्यांनी आपल्या भाषणात तैत्तिरीय पदपाठाची वैशिष्ट्ये सांगितली. सारस्वत अतिथी प्रा. रवींद्र मुळे यांनी पदपाठाच्या विषयी अभ्यास करतांना कशी दृष्टी असावी हे स्पष्ट केले.

  या प्राध्यापक मंडळींची उपस्थिती

  या प्रसंगी डॉ. विद्या सागी यांनी लौकिक मंगल केले, तर श्रीमती मुक्ता मुळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वैष्णवी पाटील यांनी मंडळाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानत उद्घाटन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमप्रसंगी संस्कृत क्षेत्रातील अनेक विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.