subhash desai

शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेत नेतेमंडळींचे इन्कमिंग सुरु आहे. त्यात आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या पुत्राने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.

सुभाष देसाई म्हणाले, ‘माझा मुलगा भूषण देसाईने आज शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना ही माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील’.

माझे कार्य सुरु ठेवणार

वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे, असेही सुभाष देसाई म्हणाले.

एकनाथ शिंदेंचं काम जवळून पाहिलं : भूषण देसाई

हिंदुत्त्वाचा विचार, साहेबांचे स्वप्न पुढे कोण घेऊन जात असतील तर ते आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आम्ही एकमेकांनी सोबत काम केले आहे. त्यांचं काम मी जवळून पाहिलंय. त्यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचे काम पाहून त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय झाला आहे, असे भूषण देसाई यांनी पक्षप्रवेशादरम्यान म्हटलंय.