कराड उत्तरेत महसुलची दबक्या पावलांनी ‘वरकमाई’ ; जनतेला तोंड दाबून बुक्क्यांचा मार तर तलाठी, सर्कल आणि  कोतवाल मालामाल!

चिरीमिरीची अंगवळणी पडलेली सवई आणि मिळेल तिथं डल्ला मारायची वृत्ती अंगिकारलेली सरकारी बाबूंची हेराफेरी नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार देत आहे.कराड तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या महसुली मंडळात दबक्या पावलांनी चाललेली वरकमाई नागरिकांच्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

  अनिल कदम, उंब्रज : चिरीमिरीची अंगवळणी पडलेली सवई आणि मिळेल तिथं डल्ला मारायची वृत्ती अंगिकारलेली सरकारी बाबूंची हेराफेरी नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार देत आहे.कराड तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या महसुली मंडळात दबक्या पावलांनी चाललेली वरकमाई नागरिकांच्यात चर्चेचा विषय ठरला आहे.प्रांताधिकारी अतुल म्हेत्रेचा कडक स्वभाव चिरीमिरी साठी बोकाळलेल्या तथाकथित रावसाहेब आण्णासाहेबांना अडचणींचा ठरत आहे.यामुळे प्रशासकीय इमारतीतील वरच्या मजल्यापेक्षा खालच्या मजल्यावर वर्दळ पिंगा घालू लागली आहे.’मी नाही त्यातली’अशी बरीच मंडळी आडपडद्याने आपल्या भातावर डाळ ओढण्यात मग्न असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

  महामार्गाचे ठेकेदार नको त्यांच्या मागे पुढे करत असल्याने कराड महसुलची दिशा नक्की कोणत्या मार्गाने जाते हे स्पष्ट होत आहे.उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरिवळे ता.कराड येथील अवैध वाहतूक करताना पकडलेली वाहने सोडून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे नाव सांगून कराड तहसील कार्यालयात सोन्याच्या किमतीचा वावर असणाऱ्या व्यक्तीने एका भल्या मोठ्या रकमेची ‘तोड’ केल्याची चर्चा असून ‘तो’व्यक्ती कराड महसूल मधील नक्की कोणाच्या जवळचा याबाबत उलटसुलट चर्चा आहेत.तालुक्यातील अनेक महसुली मंडळातील मंडलाधिकरी व गावकामगार तलाठी मनमानी कारभार करीत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नसून नाहक त्रास देण्याचा उद्देशाने कामकाज राबविले जात आहे.

  ‘त्या’ वाळूच्या प्लॉट बाबत कराड उत्तरेत उलटसुलट चर्चा असून संबधित ठिकाणचे मंडलाधिकरी सतत मुंबई येथील उच्च न्यायालयात कामानिमित्त जात येत असल्याने प्रत्यक्ष कामाचा दिवस आणि प्रवासाचे दोन दिवस असे मिळून तीन दिवस त्यांची गाठभेट होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार असून शनिवार,रविवार व इतर सुट्टीचा दिवस पकडला असता मंडलाधिकरी यांचे दर्शन दुर्मिळ झाल्याचीच ओरड आहे.यामुळे त्या वाळूच्या प्लॉट मध्ये सुरू असलेला अनागोंदी कारभार लवकरच दै.प्रीतिसंगमच्या माध्यमातून सर्वांसमोर उघड केला जाणार आहे.

  ‘ते’ तलाठी अजूनही आपल्याच तालात!

  इंदोली परिसरातील ‘त्या’तलाठ्याचे कारनामे अजूनही संपता संपेना अशीच कुजबुज नागरिकांच्यात असून बऱ्याच तक्रारी झाल्या तरी आमचं काहीच वाकड होऊ शकत नाही अशा अविर्भावात नागरिकांशी उर्मट व उद्धट वागणे सुरूच असल्याने लवकरच बढती मिळून मंडलाधिकरी पदाची चव चाखायला मिळणार असल्याने ‘ते’तलाठी अजूनही आपल्याच तालात वावरत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

  इंदोलीचा वाळू उपसा एक  गूढ रहस्य

  सुमारे चाळीस अटी आणि शर्तीचा सोपस्कार पूर्ण केल्या शिवाय वाळू उपसा करता येणार नाही अशी अट असताना संबधित ठेकेदाराने ३० सप्टेंबर पूर्वीच महसूल यंत्रणा मॅनेज करून आपले उखळ पांढरे करायला सुरुवात केली वजन काटा तर केलेला वरखर्च वसूल झाल्यानंतर सुद्धा सुरू झाला नसल्याची चर्चा असून स्थानिक महसूल यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखवून स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त असल्याने कराड उत्तरेत महसूल विभागाची चंगळ सुरू आहे.यामुळे इंदोलीचा वाळू उपसा आणि त्याचे गूढ रहस्य लवकरच उलगडले जाणार आहे.