आमदनी अठ्ठनी खर्च रुपया, खर्चा रुपया! 10 हजार कमावणाऱ्या सुरक्षा रक्षकाला आयकर विभागाने पाठवली 1 कोटींची नोटीस

कल्याणमध्ये राहणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला आयकर विभागाने 1 कोटी 14 लाख रुपयांची नोटीस पाठवली आहे. त्यांनी त्याची तक्रार आयकर विभागाकडे नेऊन चौकशी केली आहे.

  मुंबई : आयकर (Income Tax) भरणाऱ्या व्यक्तीला त्याच्या उत्पन्नानुसार आयकर भरावा लागतो. मात्र, कल्याणमधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथे, हाऊस किपिंग (House Keeping) आणि सिक्युरिटी गार्ड (Security Guard) म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला आयकर विभागाने चक्क 1 कोटी 14 लाख रुपयांचा आयकर भरण्याची नोटीस पाठवली आहे. चंद्रकांत वरक (56 वय) असे त्यांचे नाव आहे.

  नेमकं प्रकरण काय?

  कल्याणमधील ठाणकरपाडा भागातील जैन चाळीत ५६ वर्षीय चंद्रकांत वरक आपल्या बहिणीसोबत राहतात. ते कधी घराचे रक्षण किंवा सुरक्षा रक्षक म्हणून तर कधी कुरिअर बॉय म्हणून काम करतात.  10,000 पगारावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र बुधवारी (1 फेब्रुवारी) त्यांना आयकर विभागाकडून 1 कोटी 14 लाख रुपये भरण्याची नोटीस मिळाली. त्यानंतर हा प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे.

  आयकर विभागाकडे  तक्रार

  चंद्रकात वरक यांना विचाराले असता त्यांनी सांगितलं की, ही नोटीस मिळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आयुष्यात इतका पैसा फक्त टीव्हीवर पाहिला आहे. या प्रकरणी चंद्रकांत वरक यांनी आपली आयकर विभागाकडे  तक्रार केली असता त्यांना आयकर विभागाच उत्तर ऐकूण आणखीनच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचा पॅनकार्ड क्रमांक वापरून परदेशात खरेदी केल्याचे त्यांना सांगण्यात आले. या सगळ्यापासून अनभिज्ञ असलेल्या चंद्रकांत वरक यांनी या  प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

   

  पॅन कार्ड वापरुन चीनमध्ये केली खरेदी?

  चौकशी केली असता, प्राप्तिकर विभागाने त्यांना सांगितले की त्यांचे पॅन कार्ड आणि कागदपत्रे वापरून चीनमधून वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या खरेदीवर कर भरलेला नाही. अधिकाऱ्यांनी त्याला पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. आता चंद्रकांत वरक यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याचे धाडस दाखवले आहे.