मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ, `या` भागातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याची सूचना

मुंबईतील हवेची गुणवत्ता कमालीची घसरलीय. गेल्या आठवड्यापासून मुंबईसह पश्चिम, मध्य उपनगरांमध्ये सकाळपासूनच धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळं प्रदुषणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

    मुंबई : राज्यात मान्सून सध्या परतीच्या मार्गावर आहे, तर काही ठिकाणी मान्सून पूर्णपणे गायब झाला आहे. सध्या ऑक्टोबर महिना सुरू असून दिवसभर वातावरणात कमालीची उकाडा जाणवत आहे. तसंच सध्या गुलाबी थंडी चाहूल देखील सर्वांनाच जाणवू लागली आहे. मात्र अशातच मुंबईतील हवेची गुणवत्ता कमालीची घसरलीय. गेल्या आठवड्यापासून मुंबईसह पश्चिम, मध्य उपनगरांमध्ये सकाळपासूनच धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळं प्रदुषणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

    हवेच्या प्रदूषणात वाढ

    कल्याण, डोबिंवली, बदलापूर, अंबरनाथ, मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, ठाणे आदी शहरात हवेत धुक्याचे साम्राज्य पाहयला मिळतय. या धुक्यामुळं हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळं आजार वाढण्याची शक्यता असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे. पहाटे धुक्यामुळं वाहन चालताना अडचणीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. धूक्यातून वाट कशी काढायची? हा प्रश्न वाहन चालकांसमोर आहे. मुंबईत पावसाळ्यात हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत होती. मान्सूनच्या पुनरागमनानंतर वाऱ्यांचा वेग मंदावला असून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळं वाढत्या ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकरांना आरोग्याची काळजी घ्यावी लागत आहे.

    हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराजवळील हवेची गुणवत्ता सर्वाधिक ढासळली आहे. यानंतर तेथील नागरिकांसाठी आरोग्याची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

    “प्रत्येकाला अस्वस्थता वाटू शकते. लोकांनी दीर्घकाळ बाहेर राहणं टाळलं पाहिजे कारण यामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात,” असा इशारा देण्यात आला आहे. तसंच लोकांना सीएनजीच्या वापरावर भर देत वायू प्रदूषण कमी करण्यात मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.