भाजीपाल्याच्या मागणीत, भावात वाढ; परराज्यांतून सुमारे ८० ट्रक फळभाज्यांची आवक

विविध भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाल्याने रविवारी भेंडी, गवार, हिरवी मिरची, सिमला मिरची, काकडी, फ्लॉवर, शेवगा, घेवडा, मटार, पावट्याच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेने दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर भाजीपाल्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

    पुणे : पावसाने नुकसान झाल्याने मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेने वीस ट्रक कमी झाली. विविध भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरची, सिमला मिरची, काकडी, फ्लॉवर, शेवगा, घेवडा, मटार, पावट्याच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेने दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर भाजीपाल्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

    गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (ता. ८) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे आठ ते १० टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी तीन ते चार टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून दोन ते तीन टेम्पो शेवगा, इंदूर येथून पाच ते सहा टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा दोन ते तीन टेम्पो, भुईमूग शेंग दोन ते तीन टेम्पो बंगळूर येथून आले. एक टेम्पो, बंगळूर येथून दोन टेम्पो आले, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे आठ टेम्पो आवक झाली होती.

    स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ६०० ते ७०० गोणी, गवार आणि भेंडी प्रत्येकी सुमारे पाच ते सहा टेम्पो, टोमॅटो सुमारे आठ ते १० हजार क्रेट, हिरवी मिरची चार ते पाच टेम्पो, काकडी पाच ते सहा टेम्पो, सिमला मिरची, तांबडा भोपळा आणि फ्लॉवर चार ते पाच टेम्पो, कोबी पाच टेम्पो, स्थानिक शेवगा चार टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे ४० ते ६० गोणी, पावटा दोन ते तीन टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा परिसरातून मटार ४० ते ५० गोणी, कांदा सुमारे ११५ ते १२० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ४० ट्रक इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.