पुणे शहरात संसर्गजन्य आजारात वाढ, गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी; फ्लूच्या रुग्णसंख्येत भर

पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये थंडी वाढल्याने संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे, हातांच्या बोटांवर सूज येणे या प्रकारची लक्षणे सध्या रुग्णांमध्ये आढळून येत आहेत.

    पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये थंडी वाढल्याने संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे, हातांच्या बोटांवर सूज येणे या प्रकारची लक्षणे सध्या रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. याबरोबरच ‘इन्फ्लुएन्झा’ विषाणूचे प्रकार असलेल्या ‘एच-१ एन-१’ आणि ‘एच-३ एन-२’ या आजारांचेही रुग्ण आढळून येत आहे. सध्याचे वातावरण विषाणूचा प्रादूर्भाव होण्यासाठी पोषक असल्याने संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    शहरात ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत उष्ण वातावरण होते, तर गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे; तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढते. त्यामुळे दर वर्षी या दिवसांमध्ये आजारांचे प्रमाण वाढते. ‘रुबी हॉल क्लिनिक’च्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे म्हणाल्या, ‘सध्या डेंगी आणि इन्फ्लुएन्झाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. शहराबरोबरच राज्यातही फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.’

    आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एक जानेवारी ते ३१ मे या कालावधीत स्वाइन फ्लू (एच१एन१) च्या ५३७ रुग्णांची नोंद झाली, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. एक जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ५८८ रुग्ण आढळून आले, तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. एक जानेवारी ते ३१ मे या कालावधीत एच-३ एन-२ या विषाणूच्या ५१८ रुग्ण आढळून आले असून, यातील सात रुग्णांचा मृत्यू झाला. एक जून ते ३१ ऑक्टोबर या कावावधीत १,४९१ रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला.