आवक घटल्याने कांदा, मिरची, गाजर, शेवग्याच्या दरात वाढ; अन्य फळभाज्यांचे दर स्थिर

नवरात्रोत्सवामुळे फळभाज्यांना बेताची मागणी आहे. आवक कमी झाल्याने कांदा, हिरवी मिरची, शेवगा, गाजर, बीट या फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

    पुणे : नवरात्रोत्सवामुळे फळभाज्यांना बेताची मागणी आहे. आवक कमी झाल्याने कांदा, हिरवी मिरची, शेवगा, गाजर, बीट या फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

    गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२२ ऑक्टोबर) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. नवरात्रोत्सवातील उपवासामुळे फळभाज्यांना मागणी बेताची आहे. दसऱ्यानंतर फळभाज्यांच्या मागणीत वाढ होईल.

    गुजरात, कर्नाटकमधून ७ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, इंदूरमधून २ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ६ ते ७ टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ६० ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

    पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, भुईमूग शेंग ४० ते ५० गोणी, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ४ ते ५ टेम्पो, कांदा ६० ट्रक अशी आवक झाली.