बिबट्यामुळे ऊस तोडणीच्या दरात वाढ; ‘या’ परिसरातील स्थिती

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगतच्या गावांमध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याचे बोलले जात आहे. पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. या अफवेने काही ठिकाणी मजूर उसाचा फड सोडून टोळी निघून गेल्याचे प्रकार घडले आहेत.

  पुणे : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगतच्या गावांमध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याचे बोलले जात आहे. पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. या अफवेने काही ठिकाणी मजूर उसाचा फड सोडून टोळी निघून गेल्याचे प्रकार घडले आहेत. अफवेमुळे उसाचे तोडणी मजुरांनी मजुरीचे दर वाढविले आहेत. परिणामी ऊस उत्पादकांची मोठी कोंडी झाली आहे.

  पळसदेव व परिसरात काळजी घेण्याचे आवाहनही काही समाजहितचिंतक सोशल मीडियावरून करीत आहेत. मात्र, सदर ठिकाणी बिबट्यासदृष्य प्राण्याचे ठसे अथवा काही पुरावा मिळतोय काय याची वनविभागाने पाहणी केल्यानंतर तसे काहीच आढळून येत नसल्याने या अफवा असल्याचे सिद्ध होत आहे.

  एकरी ऊस तोडणीचा खर्च दहा हजारांवर

  दरम्यान, बिबट्याच्या अफवेने सध्या ऊस तोडणी मजुरांनी तोडणीचे दर वाढविले आहेत. सध्या तोडणी करण्यात येणारा फड पेटवून द्यावा लागत आहे. यानंतर ऊस तोडणी सुरू केली जात आहे. याशिवाय मजुरांना प्रतिटन ३० रुपये, ट्रक्टर चालकाला प्रतिखेप ३०० रुपये व जेवणाचा डबा, मजुरांना दररोज चिकन किंवा मासे पुरवावे लागत आहेत. यामुळे एकरी ऊस तोडणीचा खर्च दहा हजारांच्या घरात पोचत असल्याची खंत काही फडमालकांनी व्यक्त केली.

  ज्या ठिकाणी बिबट्या आढळून आल्याचे सांगितले जात आहे, त्या भागात आमच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र बिबट्याच्या पायाचे ठसे अथवा इतर काही पुरावा आढळून आलेला नाही. तरीही आम्ही एखाद्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्याची गरज आहे का याची पडताळणी करत आहोत. शिवाय रेस्कू टिमला बोलावून शहानिशा केली जाणार आहे.

  - अजित सूर्यवंशी, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी