सांगलीत ऊसाच्या क्षेत्रात वाढ , कवठेमहांकाळ आघाडीवर; दुष्काळी तालुक्यात वाढले क्षेत्र

 १ लाख २४ हजार हेक्टरवरील होणार पुढच्या वर्षी गाळप खोडवा, पूर्व हंगामी ऊसाच्या क्षेत्रात घट

    प्रवीण शिंदे, सांगली :  जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यात सिंचन योजनेचे पाणी आणि अतिवृष्टी यामुळे शाश्वत पाण्याची उपलब्धता झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्यासह दुष्काळी पट्ट्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सन २०२२-२०२३ च्या गाळपासाठी १ लाख २४ हजार २६९ हेक्टरवरील ऊस उपलब्ध होणार आहे.

    गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी २ हजार २९२
    हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, चालु हंगामात कवठेमहांकाळ येथील साखर कारखाना बंद असला तरी या भागात गतवर्षीच्या तुलनेत २ हजार १४५ हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. आधीच अतिरिक्त ऊस लागवड आहे, त्यात दुष्काळी तालुक्यात वाढते क्षेत्र धोक्याचे मानले जात आहे.
    जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून उसाच्या क्षेत्र वाढ असल्याचे दिसते आहे. मुळात कृष्णा आणि वारणा नदीकाठी क्षेत्रात वाढ अथवा घटले जाते. परंतू गेल्या चार वर्षापासून जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका ऊस पिकाला बसला असला तरी, शेतकरी ऊस लागवडीसाठी पुढे येत असून त्यामुळे शेतकरी मे महिन्यापासूनच ऊस लागवड करत आहेत. जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने प्रत्येक भागातील कारखाने त्यानुसार ऊस तोडणीचे नियोजन करत आहेत. गतवर्षी १ लाख २१ हजार ९७७ हेक्टरवरील ऊस गाळपास उपलब्ध होते.

    पुढील वर्षीच्या गाळप हंगामासाठी उसाच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट होईल, असा अंदाज कारखानदारांनी व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज फोल ठरला आहे. जिल्ह्यात दोन हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे.परंतू शिराळा, खानापूर आणि जत या तीन तालुक्यातील  उसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. खानापूर, तासगाव तालुक्यात सध्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार उस क्षेत्र कमी आहे. मात्र, त्याठिकाणचे शेतकरी कारखान्यांना ऊस नोंदणीसाठी पुढे आले नसल्याचे कारखान्यांनी सांगितले आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी कारखान्यांना उसाची नोंदणी केली तर उसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज आहे.

    कारखाना बंदचा लागवडीवर परिणाम नाहीच
    कवठेमहांकाळ तालुक्यात महांकाली साखर कारखाना आहे. या तालुक्यात कारखाना झाल्याने इथला शेतकरी ऊस लागवडीकडे वळाला. गतवर्षी तालुक्यात ३ हजार ०७० हेक्टर इतका ऊस गाळपास होता. मात्र, यंदाच्या गाळपात हा कारखाना सुरु झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी मोठी कसरत करावी लागली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी ऊस पिक सोडून इतर पिकाकडे वळतील
    अशी शक्यता होती. परंतू, कारखाना बंद असल्याचा परिणाम तालुक्यात कुठे दिसत नाही. सन २०२२-२०२३ साठी तालुक्यात ५२१२ हेक्टरवर लागवड झाली आहे. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत २ हजार १४२ हेक्टरने वाढ झाली आहे.

    तालुकानिहाय सन २०२२-२३ मध्ये गाळपास उपलब्ध होणारा ऊस (क्षेत्र हेक्टरमध्ये)
    तालुका….आडसाली…..पूर्व हंगामी…. सुरु…..खोडवा….एकूण
    मिरज….५८९७…४०७५…२४०३…६४०३…१८७७९
    वाळवा…१६९०५…५२७१…२९४५…१०५८३…३५७०४
    शिराळा…१२३३….२१७९…२१०४...३४२९…८९४५
    जत…१०७…८९०…१०७६…९३१…३००४
    कवठेमहांकाळ…३२५…८७०…१७५९…२२६१…५२१५
    तासगाव..२२६५…१००९…१५३४…२५३८…७३४६
    पलूस….४१९०…३९३१…४००…५६६१…१४०८५
    खानापूर…३१०२…१८५२…१९९९...२९५२…९९०५
    आटपाडी….२७५…२८२…४३८…७१५…१७१०
    कडेगाव….५०९१…५२८१…३१३५....६०६९…१९५७६
    एकूण…३९३९०…२५६४०…१७६९४...४१५४५…१२४२६९

    चालु वर्षात गाळप झालेले उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
    आडसाली : ३९ हजार ३१४
    पूर्व हंगामी : २० हजार ८७०
    सुरु : १५ हजार ५२७
    खोडवा : ४६ हजार २५६
    एकूण : १ लाख २१ हजार ९७७‌