‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे सातारा पालिकेच्या तिजोरीत भर; ८१२० नागरिकांनी भरली पूर्ण घरपट्टी

हर घर झंडा अभियान सातारा पालिकेसाठी चांगलेच वरदान ठरले आहे. या अभियानाला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, गेल्या आठ दिवसात ८१२० नागरिकांनी पालिकेची संपूर्ण घरपट्टी भरली आहे. यामुळे यंदा पालिकेच्या महसूलामध्ये तब्बल पंधरा टक्के वाढ झाल्याचे लेखा विभागाने स्पष्ट केले. या नागरिकांना भारताचा राष्ट्रध्वज देण्यात येणार असल्याचे, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी सांगितले.

    सातारा : हर घर तिरंगा अभियान सातारा पालिकेसाठी चांगलेच वरदान ठरले आहे. या अभियानाला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, गेल्या आठ दिवसात ८१२० नागरिकांनी पालिकेची संपूर्ण घरपट्टी भरली आहे. यामुळे यंदा पालिकेच्या महसूलामध्ये तब्बल पंधरा टक्के वाढ झाल्याचे लेखा विभागाने स्पष्ट केले. या नागरिकांना भारताचा राष्ट्रध्वज देण्यात येणार असल्याचे, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी सांगितले.

    सातारा पालिकेची वसुली गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये अगदीच मंदावली होती. केवळ १४ ते १५ टक्के वसुली होत असल्याने पालिकेला ठेकेदारांच्या बिलांसह दैनंदिन खर्च भागवण्याची सुद्धा दरम्यानच्या काळात अडचण झाली होती. अशा परिस्थितीत सातारा पालिकेचा वसुली विभाग सातत्याने शंभर टक्के वसुलीसाठी प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सातारा शहरातील जे गाळे बंद अवस्थेत आहेत, अशा ३१४ गाळ्यांपैकी सदर बाजार जुना मोटर स्टँड येथील सात ते आठ गाळ्यांचे लिलाव प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याच्या जोडीने सातारा पालिकेने सुरू केलेल्या हर घर तिरंगा अभियानामध्ये सातारकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

    सातारा पालिकेने १०० टक्‍के घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना तिरंगा भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जाहीर होताच गेल्या १२ दिवसांमध्ये पालिकेच्या महसूल आम मध्ये १५ टक्क्याने वाढ झाल्याचे लेखा विभागाकडून सांगण्यात आले. साधारण दिवसाची वसुली जी साडेतीन ते चार लाख या दरम्यान येत होती, ती सध्या बारा लाखाचा आकडा ओलांडून गेली आहे. तसेच याचा फायदा सातारा पालिकेला जी लोक वर्गणी काही टप्प्यांमध्ये भरायची आहे, या महसुलाचा त्यालाही चांगलाच हातभार लागणार आहे.

    शहरातील आतापर्यंत ८१२० नागरिकांनी शंभर टक्‍के घरपट्टी भरण्याचा विक्रम केला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आणखी महसुलाचा आकडा वाढेल, असे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी स्पष्ट केले आहे. सातारा पालिकेने केंद्र शासनाच्या योजनेमध्ये तब्बल दहा हजार तिरंगा ध्वज याची ऑर्डर नोंदवली आहे. हे तिरंगा भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून सातारा पालिकेकडे पोहोचं होणार आहेत. पालिकेच्या महसुलाचा आकडा या योजनेमुळे चांगलाच वाढला असून, या योजनेच्या निमित्ताने या महिन्याची वसुली साधारण दोन कोटी रुपयांच्या घरात जाईल, असे पालिकेतील लेखा विभागाच्या वतीने सांगण्यात आले