कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ! येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळाला सरासरी 1300 रुपये बाजार भाव

देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत असल्याने तसेच कांदा निर्यात बंदीमुळे पस्तीसशे रुपये सरासरी बाजार भाव असलेले कांद्याचे दर तेराशे रुपये सरासरीपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा अधिक पुरवठा होत असल्याने तसेच कांदा निर्यात बंदीमुळे पस्तीसशे रुपये सरासरी बाजार भाव असलेले कांद्याचे दर तेराशे रुपये सरासरीपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. येवला बाजार समितीत कांद्याला जास्तीतजास्त 1425 रुपये, सरसरी 1300 रुपये तर कमीतकमी 350 रुपये इतका प्रतिक्विंटलला दर मिळत असल्याने कांदा दर घसरण रोखण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी कांदा उत्पादकांकडून केली जाते.

    लासलगाव बाजार समितीत देखील कांद्याच्या भावात घसरण सुरूच असून दोन महिन्यात सुमारे 2500 रुपयांची तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज सरासरी भावात क्विंटल मागे 400 रुपयांची घसरण झाली आहे. दोन महिन्या पूर्वी कांद्याला 3500 ते 3800 रुपये तर गेल्या आठवड्यात कांद्याला सरासरी 1750 रुपये भाव मिळाला होता. मात्र त्यात घसरण होऊन आज कांद्याला 1350 रुपये भाव मिळाला आहे.नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात देखील हीच परिस्थिती असून कांद्याच्या भावात सारखी घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.