पुण्यासह चार जिल्ह्यांत पाणीटंचाईत वाढ; टॅंकरने पाणीपुरवठा कराव्या लागणाऱ्या गावांची संख्या वाढली

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अजूनही अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे विभागात अजूनही टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

  पुणे : पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अजूनही अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुणे विभागात अजूनही टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

  ९५ हजार ७८३ नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा

  मे महिन्यात पुणे विभागात ५१ टॅंकरने ६२ गावांमधील ९५ हजार ७८३ नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता यामध्ये वाढ होऊन १५५ टॅकरने १४६ गावांमधील ३ लाख ४ हजार नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. असाच पाऊस लांबल्यास टॅंकरच्या संख्येमध्ये अजून वाढ होण्याची शक्‍यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

  यंदा मान्सूनचे काहीशा विलंबाने आगमन

  यंदा मान्सूनचे काहीशा विलंबाने आगमन झाले. लांबलेल्या पावसामुळे त्याचा परिणाम शेतीसह पिण्याचा पाण्यावर सुध्दा झाला आहे. जुलैअखेरीस तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे धरणे जेमतेम भरली. मात्र, अजूनही बहुतांश भागात चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाणी पातळी आणखीनच खोल गेली असून अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात मे महिन्यात टॅंकरची संख्या सर्वाधिक असते. मात्र, ऐन पावसाळ्यात अनेक गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे.

  जिल्ह्यात ३६ गावांमधील २७१ वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणी

  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, पुरंदर आणि शिरुर या पाच तालुक्‍यातील ३६ गावांमधील २७१ वाड्यावस्त्यांना ४० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील खासगी २३ विहिरींचे प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्‍यातील ७ गावांमधील ४४ वाड्यावस्त्यांवरील २२ हजार ५७ नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जुन्नरमधील ११ गावांमधील १६ हजार ११८ नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.