वाढत्या उन्हाचा प्राण्यांवर होतोय विपरित परिणाम; उष्माघातामुळे चार माकडांचा मृत्यू

उष्मघातामुळे धाराशिवमध्ये चार माकडांचा मृत्यू झाला आहे

    धाराशिव – सध्या राज्यामध्ये सर्वत्र उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तापमानाचा पार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वांची लाही लाही होत आहे. आपल्या सर्वांवर वाढत्या उन्हाचा परिणाम होत असून प्राणीमात्रांवर देखील याचा विपरित परिणाम होत आहे. उष्मघातामुळे धाराशिवमध्ये चार माकडांचा मृत्यू झाला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून वन विभागाने याची दखल घेतली आहे.

    धाराशिव तालुक्यातील येडशी येथे डोंगर दरीत प्रभू रामलिंगाचे मंदीर आहे. या मंदिर परिसरात माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढला असून याचा परिणाम येथील माकडावरही होत आहे. उष्मघातामुळे दोन दिवसापुर्वी ४ माकडांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. वन विभाग व पशुसंवर्धन विभागाने सतर्क होऊन तात्काळ उपचार सुरू केल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

    या घटनेनंतर आता सर्व माकडं सतर्क झाली आहेत. वन्य जीवांच्या संरक्षणासाठी भाविकांनी सुध्दा घरचे किंवा खराब अन्न न टाकता योग्य अन्न टाकावे असे आवाहन वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच सर्वांनी उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करावे त्याप्रमाणे प्राणीमात्रांची देखील काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.