दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे इंदापूरकरांचे पाण्यासाठी हाल! ; राष्ट्रवादीचा गुरुवारी इंदापूर नगर परिषदेवर मोर्चा

उजनी जलाशयात पाणीसाठा भरपूर असून देखील एक दिवसाआड,दोन दिवसाआड पाणीपुरवठा इंदापूर शहरातील नागरिकांना होत आहे.नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल चाललेले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी (दि.२४) इंदापूर नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

    इंदापूर : उजनी जलाशयात पाणीसाठा भरपूर असून देखील एक दिवसाआड,दोन दिवसाआड पाणीपुरवठा इंदापूर शहरातील नागरिकांना होत आहे.नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल चाललेले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गुरुवारी (दि.२४) इंदापूर नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली. ते रविवारी (दि.२०) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष शैलेश पवार उपस्थित होते.

    प्रसंगी बोलताना गारटकर म्हणाले की, इंदापूर शहरासाठी असणारी पाणी योजना उजनी जलाशयातून आहे. त्या जलाशयात पाणीसाठा भरपूर आहे.तरी देखील अशा परिस्थितीतून शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या विषयाला वाचा फोडण्यासाठी इंदापूर शहरातील संभाजी चौक येथून मुख्य बाजारपेठे मार्गे इंदापूर नगरपरिषदेपर्यंत मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निघणार आहे.

    इंदापूर शहरासाठी झालेली पाण्याची योजना सदोष आहे. या योजनेस २०११ मध्ये मंजुरी मिळाली.२०१७ मध्ये योजनेचे कामं पूर्णत्वास गेले. ३७ कोटी रुपये खर्च करून ७० हजार अपेक्षित लोकसंख्येला धरून केलेली योजना सध्याची लोकसंख्या ३५ हजारांच्या आसपास असताना आत्ताच फेल जात असेल तर त्याचे कारण तपासावे लागेल.एक व्यक्तीला दरडोई दीडशे लिटर पाणी मिळाले पाहिजे. असं या योजनेचे वैशिष्ट्य आहे. योजना यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून पाण्याचे मीटर बसवण्यात आले. मीटरवर देखील ५० ते ६० लाख रुपये खर्च झालेला आहे.

    नगरपरिषदने घरपट्टी-पाणीपट्टी मध्ये प्रचंड वाढ केली आहे. शास्ती,व्याज लावत आहे.तरी देखील नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे सदरील योजना फेल जाण्यामागे कोण जबाबदार आहे. त्याची प्रशासकीय यंत्रणेमार्फत चौकशी झाली पाहिजे.यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोर्चा काढून मागणी करणार आहे.असे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी यावेळी सांगितले.