महावितरणसह महापारेषण, महानिर्मिती कंपनीच्या कंत्राटी कामगारांचा बेमुदत संप; विविध मागण्यांसाठी संपाची हाक

समान काम समान वेतन लागू करावे, वीज विद्युतच्या तिन्ही कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या एनएमआर प्रमाणे सामावून घेण्यात यावे.

    इंदापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : समान काम समान वेतन लागू करावे, वीज विद्युतच्या तिन्ही कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या एनएमआर प्रमाणे सामावून घेण्यात यावे. वयाच्या ६०व्या वर्षापर्यंत रोजगाराची शाश्वत हमी द्यावी या प्रमुख मागण्यांसह एकूण १७ मागण्यांकरिता महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी (दि.५) रात्री बारापासून बेमुदत संपाचे हाक दिली आहे.

    महाराष्ट्रातील ४२ हजार कंत्राटी कामगारांनी हा संप पुकारला असून, या संपात इंदापूर उपविभागाअंतर्गत एकूण ७४ कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष भालचंद्र कांबळे यांनी दिली.

    जे कंत्राटी कामगार गेली १० ते १५ वर्षे विद्युत महामंडळात सेवा बजावत आहेत. अशा कामगारांना वयोमर्यादेची अट शिथिल करून निघालेल्या भरतीमध्ये सामावून घेण्यात यावे. तिन्ही कंपनीतील सर्व वीज कंत्राटी कामगारांना मिळत असलेल्या एकूण पगारात १ एप्रिल २०२३ पासून मागील सर्व फरकासह ३० टक्के वेतनात वाढ करून देण्यात यावी. कोर्ट केसमधील आणि आयटीआय नाही म्हणून कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना सेवा जेष्ठतेनुसार पुन्हा तातडीने कामावर घेण्यात यावे.

    भ्रष्ट कंत्राटदारांना काळे यादीत टाकण्यात यावे. कर्तव्य बजावत असताना ज्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना नियमित कामगार म्हणून सामावून घेण्यात यावे तसेच जाहीर झालेली चार लाखांची रक्कम वाढवून १५ लाख इतकी देण्यात यावी. कंत्राटी कामगारांचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत सध्याच्या पारेषण व वितरण भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वीज कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी दिला.