उमेदवारी अर्जावर हरकती घेऊ नये म्हणून ५० लाखांची ऑफर, अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांचा गंभीर आरोप

अहमदनगर महापालिकेची तीन कोटी रूपयांची पाणीपट्टी सर्वसाधारण सभेत भाजपचे महापौर असताना माफ करून घेण्यात आली.

    अहमदनगर : भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊ नये म्हणून विखे यांच्या समर्थकांनी ५० लाख रूपयांची ऑफर दिली होती. असा खळबळजनक आरोप अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांनी केला आहे. जिल्हाधिकारी यांनी विखे यांच्या अर्जावरील हरकती फेटाळल्या असल्या तरी त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

    डॉ. सुजय विखे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार गिरीश जाधव यांनी शुक्रवारी अर्ज छानणीवेळी दोन हरकती नोंदविल्या होत्या. या हरकतींवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासमोर सुमारे नऊ तास सुनावणी झाली. त्यानंतर विखे यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. गिरीश जाधव यांनी यावर आपली भूमिका शनिवारी स्पष्ट केली. ते म्हणाले, विखे यांनी शासनाची वन विभागाची ५०० एकर जमीन १ रूपया देऊन आपल्या संस्थेसाठी घेतली. त्यांच्याकडे शासनाची ८०० ते ८५० एकर जमीन असून या जमिनीवर खासगी कॉलेज उभारून लोकांकडून करोडो रूपयांच्या देणग्या घेत आहेत. त्यावर मी हरकत घेतली होती.

    तसेच अहमदनगर महापालिकेची तीन कोटी रूपयांची पाणीपट्टी सर्वसाधारण सभेत भाजपचे महापौर असताना माफ करून घेण्यात आली. या ठरावाला सूचक, अनुमोदक तसेच महापौर हे भाजपचे असून, सर्वांनी मिळून महापालिकेची लुट केली आहे. त्यासंदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यासाठी गेलो होतो. जिल्हाधिकारी यांनी मी घेतलेल्या दोन्ही हरकती फेटाळून लावल्या. त्या कोणत्या मुद्दावर फेटाळल्या याचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही. सहकारी संस्थांचा संबंध नसतो, असे जिल्हाधिकारी सांगतात. सहकारी संस्थांचे तुम्ही थकबाकीदार असले तरीही अर्ज बाद होतो. विखे यांनी सरकारी जागेवर दिडशे कोटींचे कर्ज घेतले आहे. महापालिकेची तीन कोटी रूपयांची माफी घेतली, यावर कोणी काही बोलायचेच नाही का? असा सवालही जाधव यांनी केला आहे. त्यावेळीही त्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला होता. आता विखे समर्थकांनी ५० लाखांची ऑफर दिली असल्याचे सांगून त्यांनी नवीन गंभीर आरोप केले आहेत. मात्र ही ऑफर कोणी दिली, याबाबत त्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.