अजित पवारांच्या निकटवर्तीयाचे भाजपला मत? अपक्ष आमदार देवेंद्र भुयार पुन्हा वादात

महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मते फुटल्याने राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा समावेश दगा देणाऱ्या आमदारांमध्ये असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्याने भुयार पुन्हा चर्चेत आले आहेत(Independent MLA Devendra Bhuyar again in controversy after voting for BJP).

    मुंबई : महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मते फुटल्याने राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा समावेश दगा देणाऱ्या आमदारांमध्ये असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्याने भुयार पुन्हा चर्चेत आले आहेत(Independent MLA Devendra Bhuyar again in controversy after voting for BJP).

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील देवेंद्र भुयार हे यापूर्वीही अनेकवेळा वादात सापडले आहेत. भुयार हे आमदार होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य होते. आपल्या आक्रमक शैलीमुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. भुयार यांनी २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे नेते व तत्कालीन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते.

    स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येऊनही पक्षसंघटनेकडे लक्ष देण्याऐवजी आमदार भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक वाढवणे, पक्षाच्या काऱ्यकर्त्यांसोबत संपर्कात नसणे असे आरोप भुयार यांच्यावर होते. गेल्या मार्च महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांचेच एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी केली, त्यावेळी हीच कारणे समोर करण्यात आली होती.

    भुयार निवडून आल्यापासूनच संघटनेत सक्रीय नसल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर समाजमाध्यमांवरही त्यांनी स्वाभिमानीपासून फारकत घेतल्याचे दिसत होते. स्वाभिमानीच्या आंदोलनांमध्येही ते दिसत नव्हते. याबाबत खुद्द राजू शेट्टी यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अमरावतीत पार पडलेल्या परिवार संवाद यात्रेत भुयारही सहभागी झाले होते. व्यासपीठावरील त्यांच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

    स्वाभिमानी पक्षातून काढून टाकण्यात आल्यानंतर देवेंद्र भुयार हे आता उघडपणे राष्ट्रवादीसोबत आहोत, असे सांगू लागले आहेत. मात्र, मुख्यमंत्ऱ्यांवर, शिवसेनेवर त्यांची नाराजी आहे. ती त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत दगाबाजी करणाऱ्या आमदारांमध्ये देवेंद्र भुयार यांचे नाव घेतल्याने त्यांचे समर्थक मात्र अस्वस्थ झाले आहेत.