इंडिया आघाडीचा देशातील पहिला विजय, आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन, रायगड जिल्हा बँकेच्या निवडणूकीत इंडियाचा विजय

आजचा हा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. चांगल्या मतांनी विजय मिळाला आहे. माणिक जगताप यांचे बँकेच्या जडणघडणीत चांगले योगदान राहिले आहे.

  रायगड : रायगड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांनी वेगवेगळे आक्षेप घेतले. काहीजण न्यायालयातदेखील गेले. हा प्रश्‍न खोडून काढणारा विजय असून या निवडणूकीत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. हा विजय सर्व माझ्या कार्यकर्त्यांचा असून इंडिया आघाडीचा देशातील पहिला विजय आहे. याची मुहूर्त मेढ रायगड जिल्ह्यात रोवली गेली आहे, असे उद्गार आ. जयंत पाटील यांनी रविवारी काढले. बँकेच्या संचालक मंडळाच्या विजयानंतर पाटील बोलत होते.

  यावेळी माजी आ. पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जि.प. माजी सदस्या चित्रा पाटील, प्रदिप नाईक, अ‍ॅड. गौतम पाटील, माजी नगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, संजना कीर, अ‍ॅड. परेश देशमुख, यतीन घरत, संदीप घरत, संतोष जंगम, अ‍ॅड. सचिन जोशी, सुरेश घरत, विलास म्हात्र, शेकाप महिला आघाडी तालुका प्रमुख प्रिती पाटील, अशोक प्रधान, नागेश कुलकर्णी असे अनेक पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, व कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  याप्रसंगी आ. जयंत पाटील म्हणाले, गेली ३० वर्षापासून सहकार चळवळीत काम करीत आहेत. बँकेचे कामकाज आधुनिक करून कमी कालावधीत बँकेची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बँकेची उलाढाल ३५ कोटीवरून पाच हजार कोटीपर्यंत नेली आहे. जिल्हा बँकेप्रमाणे प्राथमिक संस्थांचे कामकाजदेखील अद्ययावत झाले पाहिजे या भूमिकेतून काम केले जाणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूकीत नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे. सुरुवातीला अनेक विरोध झाले. मात्र त्या विरोधाला मात करीत शेकापने घवघवीत यश संपादन केले आहे. आपल्यावर ठेवलेला विश्‍वास हाच आपला विजय आहे. आजचा हा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. चांगल्या मतांनी विजय मिळाला आहे. माणिक जगताप यांचे बँकेच्या जडणघडणीत चांगले योगदान राहिले आहे. त्यांची आठवण म्हणून त्यांचे बंधू हनुमान जगताप यांना बिनविरोध निवडून दिल्याचा आनंद आहे. अर्ज भरताना महाविकास आघाडी म्हणून भरला होता. आता मात्र महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट झाली आहे. त्यामुळे हा विजय इंडिया आघाडीचा आहे, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

  हुकूमशाहीची राजवट नष्ट करायची आहे
  देशात राजकीय वातावरण बिघडू चालले आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. देशात इंडिया आघाडीच्यामार्फत सर्व पक्ष एकत्र आले आहेत. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला स्थान दिले आहे. ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. देशात सुरु असलेली हुकूमशाहीची राजवट नष्ट करून संविधान आपल्याला वाचवायचे आहे असे आ. जयंत पाटील म्हणाले.

  अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवा
  जिल्ह्यामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई राज्यकर्त्यांची जोरात सुरु केली आहे. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. या कारवाईने अनेक जण बेघर होऊ लागले आहेत. ही दडपशाही कधीच शेकाप सहन करणार नाही. ही कारवाई थांबवा असा सज्ज इशारा आ. जयंत पाटील यांनी दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या पाठीशी शेकाप कायमच आहे अशी ग्वाही देखील दिली आहे.

  अलिबाग झाला लालेलाल
  अलिबागमधील अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज ऑफ लॉमधील सभागृहात मतमोजणीला सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरुवात झाली. संचालक पदाच्या निवडणूकीत २१ जागांपैकी १८ जागांवर आधीच विजय मिळविला होता. तीन जागांसाठी मतदान झाले. त्यामध्ये इतर शेती सहकारी संस्था मतदार संघात आ. जयंत पाटील, महिला राखीव मतदार संघात मधुरा मलुष्टे व प्रिता चौलकर यांनी घवघवीत यश संपादन केल्यावर विजेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली. प्रत्येकाच्या हातात लाल झेंडा होता. मतमोजणीची सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यावर बँड पथक सज्ज झाले. मिरवणूकीसाठी जीप फुलांनी सजविण्यात आली. लाल बावटे की जय, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो अशा अनेक घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जेएसएम महाविद्यालय ते शेतकरी भवनपर्यंत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये असंख्य शेकाप कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. बँड पथकाच्या तालावर नाचत विजयाचा आनंद प्रत्येकजण मनमुरादपणे लुटत होतेे. फटाक्यांच्या आतिषबाजीसह शहरातील मारुती नाका, बालाजी नाका, महावीर चौक, प्राजक्ता हॉटेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आ. जयंत पाटील यांचे पुष्पहार देऊन अभिनंदन करण्यात आले. बालाजी नाका ते मारुती नाक्याच्या दरम्यान फुलांचा वर्षावही अलिबागकरांनी करीत आ. जयंत पाटील व सर्व विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले.

  विरोधकांना चारली धुळ
  इतर शेती सहकारी संस्था मतदार संघाच्या एक जागेसाठी शेकापचे आ. जयंत पाटील यांच्या विरोधात संतोष देशमुख उभे राहिले होते. आ. जयंत पाटील यांनी ९९ पैकी ९४ मते मिळवून भरघोस मतांनी विजय मिळविला. विरोधकाला दोन अंकीदेखील आकडा पार करता आला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे फक्त पाच मते मिळवून समाधान व्यक्त करावे लागले. तसेच महिला राखीव मतदार संघाच्या दोन जागांच्या निवडणूकीत शेकापच्या मधुरा मलुष्टे यांना ६९९ व प्रिता चौलकर यांना ७०४ मते मिळाली. विरोधकांना धुळ चारून त्यांचा दारुण पराभव केला.

  शुभेच्छांचा वर्षाव
  मतदान केंद्रामध्ये सकाळी दहानंतर विजयाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.काहींनी प्रत्यक्षात भेटून तर काहींनी सोशल मिडीयामार्फत अभिनंदन करीत आ.जयंत पाटील यांच्यासह सर्वच संचालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी सर्व विजयी उमेदवारांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

  विजेत्या उमेदवारांची नावे

  आ. जयंत पाटील – अलिबाग
  प्रशांत नाईक – अलिबाग
  नृपाल पाटील – अलिबाग
  सुरेश खैरे – सुधागड
  महेश म्हात्रे – उरण
  संतोष पाटील – पनवेल
  तानाजी मते – कर्जत
  प्रवीण लाले – खालापूर
  पी.डी. पाटील – पेण
  विजय गिदी – मुरुड
  अजित कासार – मुरुड
  गणेश मढवी – रोहा
  ज्ञानेश्‍वर भोईर – तळा
  अस्लम राऊत – माणगाव
  वसंत यादव – श्रीवर्धन
  संतोष पाटील – म्हसळा
  हनुमान जगताप – महाड
  एकनाथ गायकवाड – पोलादपूर
  किसन उमटे – सुधागड
  मधुरा मलुष्टे – महिला राखीव मतदार संघ
  प्रिता चौलकर – महिला राखीव मतदार संघ