वारकर्‍यांच्या नशिबी प्रदूषित इंद्रायणीचे तीर्थ; इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली; केवळ सोपस्कर पार पाडण्यासाठी बैठकांचे सत्र

  पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीत सुरुवात झाली असतानाच पवित्र  इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. भाविक आळंदीत दाखल होत असतानाच इंद्रायणीची मृतप्राय अवस्था पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. याचा ना कोणत्या शासकीय विभागाला खेद आहे ना खंत. केवळ एसी हॉलमध्ये बसून चर्चेच्या फैरी झाडण्यात यंत्रणा मश्गुल आहे. तर कार्तिकीवारीचे नियोजन करणारी शासकीय यंत्रणा किती तकलादू आणि असंवेदनशील आहे, याची प्रचिती फेसाळलेली इंद्रायणी देत आहे.

  इंद्रायणीचे रुप पाहून आळंदीकर कमालीचे संतापले

  काही दिवसांपूर्वी ११ नोव्हेंबरला फेसाळलेल्या इंद्रायणीचे रुप पाहून आळंदीकर कमालीचे संतापले होते. प्रसारमाध्यमांबरोबरच समाज माध्यमांवरदेखील फेसाळलेल्या इंद्रायणीच्या क्लिप व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कारभाराबद्दल कमालीचा रोष निर्माण झाला होता.

  केवळ चर्चेच्या फैरी झडल्या अन् विषय तिथेच संपला

  या सर्व घडामोडींनंतर येत्या 9 डिसेंबरला कार्तिकी यात्रा असून ११ तारखेला संजीवन समाधी दिन आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा नियोजनाची एक बैठक २३ नोव्हेंबरला आळंदी नगरपरिषद तर दुसरी बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. मात्र इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज संबंधित विभागाला वाटली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे विभागाीय कार्यालयात ही पार पडलेल्या बैठकीत केवळ चर्चेच्या फैरी झडल्या अन् विषय तिथेच संपला.

  सर्व शासकीय विभागांचे अधिकारी नियोजनासाठी एकत्र

  कार्तिकी यात्रा सुरु झाल्याने आता भाविक आळंदीत दाखल होऊ लागले आहेत. प्रशासनानेदेखील नियोजनासाठी कंबर कसली आहे. कधी नव्हे ते सर्व शासकीय विभागांचे अधिकारी आषाढी व कार्तिकीवारी नियोजनासाठी आळंदीत एकत्र आले होते. विशेष म्हणजे इंद्रायणी फेसाळल्यानंतर वरिष्ठ पातळीवर दोन बैठका पार पडल्यानंतरदेखील प्रदूषणाबाबत चकार अक्षरही न काढणार्‍या जिल्हा, खेड तालुका व आळंदी नगरपरिषद परिषद प्रशासनाला या प्रदूषणाचे सोयरं सुतक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.