इंदुरीकर महाराजांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; पुढील 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द

    अहमदनगर : मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह गावागावातील मराठा समाजाने उपोषण सुरू केलं आहे. नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. नेत्यांची वाहने अडवली जात आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. कँडल मार्च निघत आहेत. सार्वजनिक वाहने फोडली जात आहेत. रास्ता रोकोही केला जात आहे. मराठ आंदोलन उग्र होत असतानाच आता यात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज (इंदूरीकर) यांनी उडी घेतली आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देतानाच इंदुरीकर महाराज यांनी आजवरचा सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे.

    मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी इंदोरीकर महाराजांनी पाठिंबा दिला असून आजपासून पुढचे 5 दिवस इंदोरिकर महाराजांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इंदोरीकर महाराज देखील मैदानात उतरले असून आजपासून पुढचे 5 दिवस एकही कार्यक्रम आणि कीर्तन न करण्याचा निर्णय इंदुरीकर महाराजांनी घेतला आहे.

    राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या, जरांगेचं आवाहन

    हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. यावर देखील मनोज जरांगे यांनी राजीनामा न देण्याचं आवाहन आमदार आणि खासदारांना केलंय. यावर बोलताना ते म्हणाले की, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल. राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकारला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नाही.