पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; आरोपीला अटक

राहुरी तालुक्यातील एका गावात पाच वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केला आहे. आरोपी अत्याचार करुन थांबला नाही तर त्याने पीडितेला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने चिमुकलीची आई घटनास्थळी धावत आल्याने पीडितेचा जीव वाचला.

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील एका गावात पाच वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केला आहे. आरोपी अत्याचार करुन थांबला नाही तर त्याने पीडितेला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने चिमुकलीची आई घटनास्थळी धावत आल्याने पीडितेचा जीव वाचला.

    संबंधित घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर अशाप्रकारचं किळसवाणं आणि संतापजनक कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा द्या, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. या घटनेमुळे पीडितेच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

    दरम्यान पीडितेच्या कुटुंबियांनी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. राहुरी पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि तातडीने कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.