बारामतीतील काऱ्हाटीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक; नेमकं काय घडलं?

बारामती तालुक्यातील काऱ्हाटीमध्ये लावलेल्या सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर अज्ञातांनी शाईफेक केल्याची घटना घडली. ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिल्यानंतर सदर बॅनर खाली उतरविण्यात आला.

    बारामती : बारामती तालुक्यातील काऱ्हाटीमध्ये लावलेल्या सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर अज्ञातांनी शाईफेक केल्याची घटना घडली. ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिल्यानंतर सदर बॅनर खाली उतरविण्यात आला. शनिवारी रात्री अज्ञातांनी ही शाईफेक केली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.

    भावी खासदार अशा आशयाचा सुनेत्रा पवार यांचा फोटो असललेला एक बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर अज्ञात व्यक्तीने शाई टाकली. हा नेमका प्रकार कशातून घडला असावा, याचा पोलिस शोध घेत आहेत.

    आगामी लोकसभा निवडणूकीत सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार असू शकतात. त्यामुळे कोणी राजकीय आकसापोटी हे कृत्य केले असावे याबाबत पोलिसांनी माहिती घेण्यास प्रारंभ केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    दरम्यान या प्रकाराबाबत बारामती मध्ये पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील नाराजी व्यक्त करत अशाप्रकारे कोणावर शाई फेकणे योग्य नाही. ज्या अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला असेल, त्यांचा शोध पोलिस घेतील, असे त्यांनी सांगितले.