सोलापूर जिल्हा परिषदेचे नाविण्यपूर्ण उपक्रम राज्यास प्रेरणादायी : दत्तात्रय भरणे

सोलापूर जिल्हा परिषदेचे नाविण्यपूर्ण उपक्रम राज्यास प्रेरणादायी आहेत. राज्य सरकार ग्रामविकासासाठी अनेक योजना राबवित आहे. शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाणारा निधी जनकल्याणासाठी आहे. प्रत्येक नागरिकांनी गावाच्या विकासासाठी झटले पाहिजे.

  सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे नाविण्यपूर्ण उपक्रम राज्यास प्रेरणादायी आहेत. राज्य सरकार ग्रामविकासासाठी अनेक योजना राबवित आहे. शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाणारा निधी जनकल्याणासाठी आहे. प्रत्येक नागरिकांनी गावाच्या विकासासाठी झटले पाहिजे. ग्रामविकासाच्या योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

  सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे अमृत महोत्सवानिमित्त आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. समारंभाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, संतोष पवार, शिवाजी तळेकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

  भरणे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात विकासाच्या योजना चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यातूनच एक आदर्श गाव तयार होऊन आदर्श ग्रामपंचायती तयार होत आहेत. गावच्या प्रगतीसाठी सरपंच, ग्रामसेवक यांना महत्व आहे. त्यांनी विविध योजना गावात राबवून विकास करावा. कोणतेही काम पारदर्शिपणे केले तर गावाचा कायापालट होऊ शकतो. जिल्हा परिषदेने कोरोनाच्या काळात आरोग्य, शिक्षण तसेच विविध योजना चांगल्या प्रकारे राबविल्या. त्यामध्ये माझे गाव कोरोनामुक्त गाव’ ही जिल्ह्याची योजना महाराष्ट्रात राबविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

  पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने पुरस्कार मिळाला म्हणून तेथेच न थांबता आणखी जोमाने काम करावे. प्रत्येक नागरिकाने ग्राम विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबुराव जाधव, वैशाली सातेपुते, सुमन नेहतराव, बळीराम साठे, डॉ.निशिगंधा माळी, जयमाला गायकवाड, शिवानंद पाटील, अनिरुद्ध कांबळे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपद भूषविलेल्या पुष्पमाला जाधव यांचा पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

  केलेले काम वाजवून सांगा : पालकमंत्री भरणे

  कोरोनाचे काळात सीईओ दिलीप स्वामी यांनी केलेले काम राज्यस्तरावर गेले. राज्यस्तरावर गौरव झाला. सीईओ स्वामी यांनी विविध अभियान राबविले. मात्र, त्याचा प्रचार करण्यात ते कमी पडतात. केलेले काम वाजवून सांगा, असेही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगून सीईओ स्वामी यांचे कार्याला गौरव केला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे चांगले सहकार्य असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे टीम वर्क चांगले आहे. याचा मला पालकमंत्री म्हणून अभिमान आहे.