नवी मुंबई मनपाचा अभिनव उपक्रम, आता बसमध्ये केलीये ग्रंथालयाची स्थापना

नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, प्रवास करताना आपला वेळ मोबाईलमध्ये न घालवता प्रवाशांना एक उत्तम सोय उपलब्ध व्हावी या दृष्टीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

    नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेने लेट्स रीड फाउंडेशनच्या सहकार्याने एक अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. नवी मुंबई मनपा परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये आता ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. ज्या बस लांब पल्याच्या मार्गिकेवर धावतात त्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. इंग्रजी, मराठी मधील नामवंत लेखकांची पुस्तके या ग्रंथालयात प्रवाशांसाठी ठेवण्यात आली आहेत.


    नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, प्रवास करताना आपला वेळ मोबाईलमध्ये न घालवता प्रवाशांना एक उत्तम सोय उपलब्ध व्हावी या दृष्टीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आज मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत या ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले असून प्रवाशांनी या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले.